दाऊदच्या प्रॉपर्टीवर शौचालय बांधणार- चक्रपाणी स्वामी


दाऊदच्या प्रॉपर्टीवर शौचालय बांधणार- चक्रपाणी स्वामी
SHARES

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची भेंडी बाजारातील हॉटेलची जागा खरेदी करून तिथं एक भव्य शौचालय बांधण्याची घोषणा अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी स्वामी यांनी केली आहे. शुक्रवारी साकीनाका येथील प्रकाश हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.



१४ नोव्हेंबरला लिलाव

१४ नोव्हेंबर रोजी दाऊदच्या अफरोज हॉटेलचा केंद्र सरकारकडून लिलाव करण्यात येणार आहे. या हाॅटेलची किंमत अंदाजे १ कोटी १८ लाख रुपये इतकी आहे. ही जागा खरेदी करून दाऊदसारख्या अतिरेक्याला भारतात कुणीही घाबरत नाही हे दाखवून देण्यासाठी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा पुरस्कार करण्यासाठी चक्रपाणी स्वामी तिथं शौचालय उभारणार आहेत.


'राम मंदिराचा प्रश्न देखील सोडवा'

भारतीयांनी या आतंकवाद्यांना अजिबात न घाबरता त्यांना सामोरं जायला हवं. तसेच, सरकारने देखील अशा अतिरेक्यांची संपत्ती जप्त करावी आणि त्यावर जनतेच्या उपयोगाचे उपक्रम राबवायला हवेत. सरकारने राम मंदिराचा प्रश्न देखील लवकरात लवकर सोडवला पाहिजे, अशी मागणी देखील चक्रपाणी स्वामी यांनी यावेळी केली.

मी राजनाथ सिंग यांची भेट घेऊन त्यांना दाऊदला लवकरात लवकर पकडण्यास सांगितलं आहे. आणि जर त्यांना जमत नसेल, तर त्यांनी सर्व कागदपत्र आम्हाला द्यावीत, आम्ही दाऊदला उचलून आणू, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना सांगितल्याची माहिती चक्रपाणी स्वामी यांनी दिली.



'त्या' जागेवर रुग्णालय बनवण्याचा विचार

यापूर्वी चक्रपाणी स्वामी यांनी अशाच लिलावामार्फत दाऊदची एक मोटारकार ३२ हजार रुपयांना खरेदी करत तिचं दहन केलं होतं. यानंतर त्यांना यासंदर्भात अनेक धमक्या आल्या. त्यांच्यावर हल्ल्याचा देखील प्रयत्न झाला होता. तरी देखील पुन्हा त्यांनी दाऊदची संपत्ती विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दाऊदच्या या हॉटेलसोबतच २००१ साली अजय श्रीवास्तव यांनी २.३० लाखात नागपाडा येथील दाऊदच्या मालकीची जमीन विकत घेतली होती. ती जमीन देखील श्रीवास्तव आता अखिल भारत हिंदू महासभेला देणार आहेत. त्या जागेवर रुग्णालय बनवण्याचा विचार सुरू असल्याचं चक्रपाणी स्वामी यांनी सांगितलं.



हेही वाचा

तुम्हीही विकत घेऊ शकता अंडरवर्ल्ड डॉन 'दाऊद'ची प्राॅपर्टी!

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा