करचुकवेगिरीप्रकरणी महालक्ष्मी रेसकोर्सवरील १८ सट्टेबाजांना अटक

मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्स इथं घोड्यांच्या शर्यतीवर सट्टा खेळून करचुकवेगिरी करणाऱ्या १८ जणांना नागपाडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सट्टेबाजांकडून १ कोटी ५४ लाख १९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शर्यतींना हिरवा कंदील

मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवरील घोड्यांच्या शर्यतीला शासनाने नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे. असं असूनही येथील घोड्यांच्या शर्यतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने येथील शर्यतीवर कमी रकमेचा सट्टा खेळल्याचं दाखवून आरोपी कर बुडवत असल्याची माहिती परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार यांना मिळाली.

नोंदीत फेरफार

त्यानुसार अभिनाश कुमार यांनी शुक्रवारी सांयकाळी घोड्यांची शर्यंत सुरू असताना रेसकोर्सबाहेर पोलिस तैनात करून वस्तूस्थिती पडताळली. त्यावेळी काही स्टॉलमालक रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडमधील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने बेटिंगमध्ये स्वीकारलेल्या रकमेच्या खोट्या नोंदी करून कर बुडवत असल्याचं निदर्शनास आलं.

मुद्देमाल हस्तगत

पोलिसांच्या पथकाने रेसकोर्समधील २१ स्टॉलवर एकाच वेळी छापा टाकल्यानंतर खोट्या नोंदी करून बेटिंग घेणाऱ्या १८ जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडून १ कोटी ४० लाख ८८ हजारांची रोकड, २९ लॅपटॉप, मोबाइल फोन असा सुमारे दीड कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याचप्रमाणे बेटिंगच्या खोट्या नोंदी केलेली काही कागदपत्रेही या स्टॉलधारकांकडे सापडली.

अटक आरोपींविरोधात भादंवि कलम ४२०, ३४, जुगार बंदी कायदा आणि बॉम्बे रेसकोर्स कायदा १९१२ अंतर्गत ताडदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.


हेही वाचा-

केदारनाथ सिनेमात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक

बेकायदेशीर ऑनलाईन लाॅटरी खेळणाऱ्या आरोपींविरोधात ६०० पानी आरोपपत्र दाखल


पुढील बातमी
इतर बातम्या