बेकायदेशीर ऑनलाईन लाॅटरी खेळणाऱ्या आरोपींविरोधात ६०० पानी आरोपपत्र दाखल

जगभरातील १५ देश व भारतातील ७ राज्यांमध्ये चालणाऱ्या या ऑनलाईन गेमिंगचा सर्व्हर अमेरिकेत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑपेरा हाऊसमधून या कंपनीचे भारतातील सर्व व्यवहार चालायचे. तेथूनच विविध ठिकाणच्या विभागीय व्यवस्थापकांना कनेक्शन दिलं जायचं, तसेच फ्रेन्चायजीजना संगणकीय सॉफ्टवेअर यंत्रणाही येथूनच पुरवली जायची.

SHARE

 गेम किंग इंडिया या बेकायदेशीर संकेतस्थळाहून लाॅटरी खेळणाऱ्या ११ जणांवर सायबर पोलिसांनी कारवाई केली होती. या आरोपींविरोधात पोलिसांनी ६०० पानी दोषारोपपत्र दाखल केलं आहे. अारोपी गेम किंग नावाने सुरू केलेल्या या संकेतस्थळाच्या माध्यमातून जगभरातील १५ देश व भारतातील ७ राज्यांमुळे बेकायदेशिररित्या ऑनलाईन लॉटरी चालवायचे. या लाॅटरीची उलाढाल २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. 


पिता-पुत्र अारोपी

आंचल व रमेश चौरसिया यांना जुलै महिन्यात सायबर पोलिसांनी हरियाणातून अटक केली. मागील अनेक दिवसांपासून पोलिस त्यांच्या मागावर होते. मात्र, वेळोवेळी पोलिसांना गंडवण्यात ते यशस्वी होत होते. या पिता-पुत्रांविरोधात नागपाडा, समता नगर, कांदिवली यांच्यासह दिल्ली, लुधियाना, फरिदाबाद, नागपूर, नोएडा, फिरोजपूर, इंदौर, उज्जैन, धर, जालंधर व मेरठ येथेही गुन्हे दाखल आहेत.  


गेमिंगचा सर्व्हर अमेरिकेत

आरोपींवर २०१४ पासून १९ गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली. जगभरातील १५ देश व भारतातील ७ राज्यांमध्ये चालणाऱ्या या ऑनलाईन गेमिंगचा सर्व्हर अमेरिकेत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आरोपींविरोधात भादंवि कलम ४२०, २९४ (अ), ३४ सह लॉटरी रेग्युलेशन अॅक्ट ४ (१), ७ (३), ८,९ तसंच महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ अंतर्गत ६०० पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. 


ऑपेरा हाऊसमधून व्यवहार 

 गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ऑपेरा हाऊस येथील या कंपनीच्या मुख्यालयात छापा टाकून आंचलचा धाकट्या चुलत भाऊ निलेश चौरसियासह चार जणांना अटक केली होती. भारतातील सूत्रांनुसार, ऑपेरा हाऊसमधून या कंपनीचे भारतातील सर्व व्यवहार चालायचे. तेथूनच विविध ठिकाणच्या विभागीय व्यवस्थापकांना कनेक्शन दिलं जायचं, तसेच फ्रेन्चायजीजना संगणकीय सॉफ्टवेअर यंत्रणाही येथूनच पुरवली जायची. त्याच्या माध्यमातून ग्राहकांना १६ विविध गेम खेळण्यास मिळायचे. 


परवाना नाही

या अाॅनलाइन लाॅटरीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसंच सरकारकडून यासाठी कोणताही परवाना घेण्यात आला नव्हता. याप्रकरणी पोलिसांनी जप्त केलेले लॅपटॉप व इतर सामग्री सायबर न्यायवैधक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली आहे. त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित असून तो आल्यास पुरवणी आरोपपत्राच्या स्वरुपात दाखल करण्यात येणार आहे.हेही वाचा -  

रेल्वेत मोबाइल चोरट्यांचा सुळसुळाट; रोज शेकडो मोबाइल चोरीला

नक्षलवादी कनेक्शन: तेलतुंबडे यांची गुन्हा रद्द करण्याची याचिका फेटाळली
संबंधित विषय
ताज्या बातम्या