एटीएम वापरताय? मग तुमचीही अशीच फसवणूक होऊ शकते!

एटीएमच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सत्येंद्र मिश्रा आणि भानूप्रसाद मिश्रा अशी या दोघांची नावे आहेत. या टोळीने शहरातील विविध भागातील अनेक नागरिकांना जवळपास लाखो रुपयांना गंडवल्याचं निष्पन्न झालं असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

कशी करायचे चोरी?

एटीएममध्ये पैसे काढायला गेलेल्या अशिक्षित किंवा कमी ज्ञान असलेल्या लोकांवर हे दोघे लक्ष ठेवून असायचे. एखादा अशिक्षित वाटला, तर त्याला मदत करण्याच्या उद्देशानं एक चोर बाजूच्या मशीनवर पैसे काढत असल्याचे दाखवायचा. पैसे काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीने कार्ड स्वॅप केले की पहिला चोर त्या व्यक्तीचे लक्ष विचलीत करत असे. ती मशिन बंद असल्याचे सांगत, पैसे काढायला आलेल्या व्यक्तीला बाजूच्या मशिनवरून पैसे काढण्यासाठी बोलवायचा.

एटीएम सेशन अर्धवट सोडलं म्हणून...

कार्ड स्वॅप झाल्यानंतर सुरू असलेले सेशन अर्धवट सोडून ती व्यक्ती शेजारच्या मशीनवर पैसे काढण्यासाठी गेल्याचे पाहून, मागे रांगेत उभा असलेला दुसरा चोर त्या व्यक्तीचं सुरू असलेलं सेशन हाताळायचा. संबंधित व्यक्ती पैसे काढून निघून गेल्यानंतर शोल्डर सर्फिंगद्वारे पाहिलेल्या पिनकोडच्या आधारे हे चोर नागरिकांच्या खात्यातून पैसे काढून पळ काढायचे.

लाखोंचा गंडा!

पश्चिम उपनगरात या दोघांनी अशा प्रकारे अनेकांना लाखो रुपयांना गंडवले होते. या तक्रारींचा ओघ मुंबई पोलिसांकडे वाढत असल्याने पोलिसांनी या गुन्ह्यांकडे लक्ष केंद्रीत केले. त्यावेळी एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी या दोघांची ओळख पटवली. त्यावेळी हे दोघेही उत्तर प्रदेशच्या अमेठी येथील असल्याचे तपासात पुढे आले.

मिरारोड परिसरातून केली अटक

दरम्यान, हे दोघे मिरारोड परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना रविवारी सकाळी ताब्यात घेतले. या दोघांच्या चौकशीत मालाड, कांदिवली, बोरिवली, भाइंदर या ठिकाणी फसवणूक केल्याचे १६ गुन्हे उघडकीस आले असून दोघांनी आतापर्यंत नागरिकांना एकूण ८ लाखांना गंडवल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दोघांवर यापूर्वीही एलटी मार्ग, कुलाबा, वनराई, भोईवाडा पोलिस ठाण्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे.


हेही वाचा

सचिन तेंडुलकरच्या मुलीला अश्लिल मेसेज पाठवणारा अटकेत

पुढील बातमी
इतर बातम्या