एटीएम लुटणाऱ्या रोमानियन चोरांना दिल्लीत अटक


एटीएम लुटणाऱ्या रोमानियन चोरांना दिल्लीत अटक
SHARES

मुलुंड परिसरातील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून बँक ग्राहकांचा डेटा चोरून त्याद्वारे त्यांचे पैसे चोरणाऱ्या २ रोमानियन नागरिकांना मुलुंडच्या नवघर पोलिसांनी दिल्लीत अटक केली. गुरूवारी रात्री नवघर पोलिस या दोन्ही आरोपींना घेऊन मुंबईत येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अखिलेश कुमार यांनी दिली.


जामिनावर बाहेर, पुन्हा चोरी

मरिन दुमीत्रू ग्रामा व लोलेन लुसियन मिलू अशी या दोघांची नावे आहेत. या दोन्ही आरोपींना यापूर्वी विनोबा भावे नगर पोलिसांनी एटीएम स्किमिंगच्या गुन्ह्यांमध्ये २०१५ माध्ये अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून २८ लाख रुपये व ४९७ बनावट एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केली होती. त्यानंतर जामिनावर बाहेर आल्यावर दोन्ही आरोपींनी पुन्हा हा गुन्हा केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. या दोन्ही आरोपींचा त्यांच्या तिसर्‍या साथीदारासह २२ हून अधिक सायबर गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे.


काय आहे प्रकरण?

मुलुंडच्या नवघर परिसरातील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून या २ रोमानियन नागरिकांनी डेटा चोरला. त्यानंतर ५८ जणांच्या खात्यातून पैसे काढले आणि दिल्लीला पळ काढला. या प्रकरणी बँक ग्राहकांनी नवघर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर तपासाला सुरूवात झाली. या प्रकरणाचा सखोल तपास करत नवघर पोलिसांनी आरोपींचा माग काढला असता दोन्ही आरोपी दिल्लीत लपल्याचं निदर्शनास आलं.


'अशी' केली अटक

आरोपींचा थांगपत्ता लागताच नवघर पोलिसांचं एक पथक त्यांच्या अटकेसाठी रवाना झालं. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी दोन्ही रोमानियन चोरट्यांना बेड्या ठोकल्या. दोन्ही आरोपींना दिल्लीतील न्यायालयात हजर केल्यानंतर नवघर पोलिस या दोघांना ट्रान्झिट रिमांडच्या मदतीने मुंबईला घेऊन येत आहेत.


कशी केली चोरी?

मुलुंड येथील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये या दोन्ही रोमानियन नागरिकांनी १७ आणि १८ डिसेंबर रोजी स्कॅनर आणि सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने कार्डचं क्लोनिंग केलं आणि बनावट कार्डाद्वारे ५८ बँक ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपये काढले. रात्रीच्या वेळेस एटीएमला सुरक्षा रक्षक नसल्याचं पाहून आरोपींनी ११. ५९ ते १ वाजेच्या सुमारास ही चोरी केल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे.



हेही वाचा-

धक्कादायक, इंजिनीअर बनला सोने तस्कर!

बाप नंबरी, तर बेटा दस नंबरी!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा