बाप नंबरी, तर बेटा दस नंबरी!

नाशिकच्या शस्त्रास्त्र प्रकरणातील आरोपी सुकापाशा सोबतच त्याचा बाप अकबर किमत जान पाशाला अटक होण्याची शक्यता आहे. सुकापाशा सध्या अटकेत असून त्याच्या बापाला देखील नाशिक शस्त्रास्त्र प्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.

बाप नंबरी, तर बेटा दस नंबरी!
SHARES

आजच्या पिढीला ठाऊक असेल किंवा नसेल, पण १९९० साली कादर खान आणि शक्ती कपूर यांचा 'बाप नंबरी बेटा दस नंबरी' हा सुपरहिट सिनेमा आला होता. या सिनेमात 'पोरगं ठग, तर बाप महाठग' अशी जोडगोळी दाखवण्यात आली होती. असंच अफलातून कॅरेक्टर मुंबई पोलिसांच्या हाती लागलं असून, त्यातला एकजण साधासुधा चोरटा नव्हे, तर नाशिकच्या शस्त्रास्त्र प्रकरणातील आरोपी सुकापाशा तर दुसरा त्याचा बाप अकबर किमत जान पाशा हा आहे. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे सुकापाशा सध्या अटकेत असून त्याच्या बापाला देखील या गुन्ह्यांत अटक होण्याची शक्यता आहे.


सुकापाशावर दुसरा गुन्हा

नाशिकच्या शस्त्रास्त्र प्रकरणातील मुख्य आरोपी सुकापाशा विरोधात नुकताच पोलिसांनी दुसरा गुन्हा नोंदवला. शस्त्रास्त्र प्रकरणात पोलिसांनी अटक केल्यानंतर शिवडीच्या एका सर्व्हिस सेंटरमधून पोलिसांनी सुकाने चोरी केलेल्या गाड्या ताब्यात घेतल्या. या प्रकरणात आर.ए.के.(रफी हमद किडवाई मार्ग) पोलिसांनी सुकापाशाच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना सुकापाशाच्या घरात अनेक दुचाकी व चारचाकी कारची बोगस कागदपत्रे सापडली आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांत पोलिस सुकाच्या वडिलांवरही गुन्हा नोंदवण्याची शक्यता नाकारता येत नाही.


अकबर पाशाचं पाकिस्तान कनेक्शन!

सुका पाशाचे वडील अकबर पाशाची पार्श्वभूमीही गुन्हेगारीने भरलेली आहे. अकबर पाशालाही हत्यारांच्या तस्करीत मुंबई पोलिसांनी यापूर्वी अनेकदा अटक केली आहे. १९९५ साली अकबरवर पहिला गुन्हा हा आरएके पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. तर २०११ आणि २०१२ मध्ये वडाळा टीटी आणि आरएके पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी अकबर पाशाकडून ५ परदेशी बनावटीची पिस्तुलं, एक रिव्हॉल्व्हर, ९ एमएम पिस्तुल आणि २ सुरे हस्तगत केले होते.

मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात एमआरए(माता रमाबाई मार्ग) पोलिसांनी अकबरला अटक केली होती. अकबरचे अनेक नातेवाईक हे पाकिस्तानमध्ये आहेत. त्याने त्याच्या मुलीचा विवाहही एका पाकिस्तानी युवकाशी केला आहे. त्यामुळे अकबर आतापर्यंत अंदाजे ५ वेळा पाकिस्तानला जाऊन आल्याचे सांगितले जाते. वडाळा टीटी पोलिसांना एका गुन्ह्यात अकबरचा पाकिस्तानमधील एके-४७ सोबतचा फोटो मिळाला होता. अकबरवरही मुंबईच्या विविध पोलिस ठाण्यात दहाहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून पोलिस त्याची माहिती गोळा करत आहेत. तसेच सुकावरील गुन्ह्यात अकबरचा सहभाग आहे का? हे पडताळून पहात आहेत.


सुकापाशाचा लव्ह, सेक्स और धोखा

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत स्वतःची बरोबरी करण्यासाठी निघालेला नाशिक शस्त्रास्त्र प्रकरणातील मुख्य आरोपी बद्रीजुम्मन अकबर बादशाह ऊर्फ सुमित ऊर्फ सुका पाशावर मुंबईत १५हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे परिसरातही त्याचा दबदबा होता. २०१३ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून एका मुलीला आपल्या जाळ्यात ओढून त्याने लग्न केले होते. मात्र, त्या मुलीला वस्तुस्थिती कळल्यानंतर तिने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली होती. त्यावेळी सुकापाशाने त्या मुलीच्या घरात घुसून तिचे अपहरण करून तिच्यावर ब्लेडने ४० वार केले होते. त्यावेळी मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

या गुन्ह्यांमधील बहुतांश गुन्हे हे हत्यार तस्करीचेच असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. वडील गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे सुका वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत, गुन्हेगारी विश्वाकडे वळला होता. २०१२ मध्ये हत्यार तस्करीत सुकापाशाला अटक झाल्यानंतर त्याची रवानगी जयपूर जेलमध्ये करण्यात आली होती. त्यावेळी त्याची ओळख यूपीतील एका सराईत आरोपीशी झाली होती. जेलमध्येच त्यांनी यूपीत शस्त्रास्त्र चोरण्याचा कट रचल्याचे आता पुढे आले आहे.


पोलिस मकोका लावण्याच्या तयारीत

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सुकापाशाला पोलिसांनी मोठ्या शस्त्रसाठ्यासह पकडल्यानंतर सर्वांनीच त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यातच संघटित टोळी स्थापन करून मुंबईवर दहशत पसरवण्याच्या त्याच्या विचाराने वेळीच त्याला वेसण घालणे गरजेचे असल्याचे मत पोलिस दलातील अनेक वरिष्ठांनी व्यक्त केले. त्यामुळेच सुकापाशावर मकोका अंतर्गत कारवाई करून त्याच्या मुसक्या आवळ्यात येणार असल्याचे समजते.



हेही वाचा

नाशिक शस्त्रास्त्र प्रकरण: सुका पाशाच्या चोरीच्या गाड्या हस्तगत


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा