अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमशी बरोबरी करण्यासाठी निघालेला नाशिक शस्त्रास्त्र प्रकरणातील मुख्य आरोपी बद्रीजुम्मन अकबर बादशाह ऊर्फ सुमित ऊर्फ सुका पाशा (३५) याने चोरलेल्या तीन गाड्या दहशतवादविरोधी पथका (एटीएस)ने शिवडीच्या एका सर्व्हिस सेंटरमधून हस्तगत केल्या आहेत. सुकाने चोरीच्या सर्व गाड्या याच सर्व्हिस सेंटरमधून दुरूस्त करून घेतल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. विशेष म्हणजे चोरीच्या प्रत्येक गाडीची नंबरप्लेटही त्याच्या आवडीची म्हणजेच ७८६ या क्रमांकाची असायची.
शिवडी क्राॅसरोड परिसरात राहणाऱ्या सुका पाशावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शस्त्र तस्करीच्या गुन्ह्यात सुका पाशा शिक्षा भोगत होता. त्यावेळी चोरीच्या गाड्या लपवण्यासाठी त्याच्या टोळीतील सदस्यांनी घराशेजारील सर्व्हिस सेंटरची निवड केली. त्यासाठी टोळीतील सदस्यांनी सर्व्हिस सेंटरच्या मॅनेजरची भेट घेतली. मात्र सुका पाशाचं नाव सांगूनसुद्धा त्याने दाद दिली नाही. अखेर दोन महिन्यांपूर्वी जामिनावर तुरुंगाबाहेर आलेल्या सुका पाशाने अॅकॉर्ड कार घेऊन टोळीतील दोन सदस्यांसोबत वर्कशॉपमध्ये धडक दिली आणि बंदुकीच्या धाकावर चोरीची प्रत्येक गाडी दुरूस्त करून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुका पाशाने बंगळुरू येथून काही दिवसांपूर्वीच चोरून आणलेल्या क्रेटा, झेडएक्स, होन्डा सिटी अशा तीन गाड्या दुरूस्तीसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये आणल्या. त्यातील एका गाडीचा पार्ट मिळत नसल्यामुळे गाडी दुरूस्तीसाठी उशिर होत असल्याच्या रागातून एका कामगाराला सुकाने जिवे मारण्याची धमकीही दिली. या गाड्यांची दुरूस्ती सुरू असतानाच, नाशिक पोलिसांनी शस्त्रसाठ्यासह सुका पाशासह त्याच्या साथीदारांनी पोलिसांनी अटक केली.
"786' क्रमांकाचा शौकीन असलेल्या सुकाच्या बहुसंख्य गाड्यांना याच क्रमांकाच्या पाट्या लावल्या आहेत. चोरलेल्या गाड्यांना कधी मोटार सायकलची, तर कधी रिक्षाची पाटी लावून सुका त्या चालवायचा. ज्या जिल्ह्यात किंवा राज्यात सुकापाशा गाडी घेऊन जायचा. तेव्हा जिल्ह्यातील किंवा राज्यातील नंबरप्लेटची पाटी लावायचा. मात्र नंबरप्लेटचा शेवटचा क्रमांक कायम 786 असायचा. पोलिसांनी सुकापाशाच्या चोरीच्या गाड्या हस्तगत केल्यानंतर शिवडीतील हे सर्व्हिस सेंटर तपास यंत्रणांच्या रडावर आलं.
सुकापाशा नाशिक शस्त्रास्त्र प्रकरणात सापडल्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाईल हस्तगत केला. त्यावेळी सुकापाशा वारंवार शिवडीतील सर्व्हिस सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं एटीएस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यानुसार पोलिसांनी शिवडीतील या सर्व्हिस सेंटरची पाहणी केली असता. सर्व्हिस सेंटरच्या वर्कशॉपमध्ये सुका पाशाने लपवलेल्या गाड्या आढळून आल्या.
शिवडी परिसरात वसुलीसाठी प्रसिद्द असलेल्या सुका पाशावर ३० हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमसारखं गुन्हेगारी विश्वात स्वतःचं नाव कमवणं सुकाचं स्वप्न अाहे. २०१२ शस्त्रतस्करीत अटक झाल्यानंतर सुका पाशाची दहशत शिवडी परिसरात पसरली. याशिवाय मारहाण, खंडणी आदी विविध गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
चोरीच्या गाड्यांमधून पूर्वी सुका पाशा अंमली पदार्थांची तस्करी करायचा. या तस्करीसाठी त्याने काॅलेज तरुणांना हेरलं होतं. अंमलीपदार्थ छुप्या पद्धतीने मुंबईत आणण्यासाठी सुका पाशा या मुलांना १० हजार रुपये द्यायचा. तर काॅलेजमध्ये हे अंमली पदार्थ विक्रीसाठी त्यांना वेगळी रक्कम मोजायचा.
हेही वाचा-
मुंबईवर पुन्हा हल्ल्याचा कट? आग्रा महामार्गावर मोठा शस्त्रसाठा जप्त!