मुंबईवर पुन्हा हल्ल्याचा कट? आग्रा महामार्गावर मोठा शस्त्रसाठा जप्त!

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोठा शास्त्रसाठा जप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता होती का? असा संशय व्यक्त केला जात आहे.

SHARE

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोठा शास्त्रसाठा जप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी पोलिसांनी २५ रायफल्स, १ मशीनगन, १९ रिव्हॉल्व्हर्ससह ४००० पेक्षा अधिक जिवंत काडतुसं जप्त केली आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यातील दोघे मुंबईचे असल्याने मुंबई पोलिस देखील सतर्क झाले आहेत. मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता होती का? असाही संशय व्यक्त केला जात आहे.


दोघे आरोपी मुंबईचे रहिवासी

पकडण्यात आलेल्यांमध्ये सलमान खान, बदरी जुमन बादशहा हे दोघेही शिवडीचे रहिवासी आहेत, तर नागेश बनसोडे हा नाशिकचा रहिवाशी असल्याचं समजतंय.


पेट्रोलपंप चालकाला दाखवलं पिस्तूल

गुरुवारी रात्री चांदवड येथील पेट्रोल पंपावर या तिघांनी आपली बोलेरो गाडी थांबवली. गाडीत तब्बल २७०० रुपयांचं पेट्रोल भरल्यावर पंपावरील कर्मचाऱ्याला बंदूक दाखवून पैसे न भरताच हे तिघे पसार झाले. त्यानंतर तात्काळ पेट्रोल पपं चालकाने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांना सूचना मिळताच पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत त्यांचा पाठलाग सुरु केला.


...आणि पोलिससुद्धा चक्रावून गेले!

चांदवड टोल नाक्याजवळ साध्या वेशातील पोलिसांनी ही गाडी अडवली. त्यावेळी देखील या तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडत तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यात सापडलेला शस्त्रसाठा बघून पोलिस देखील चक्रावून गेले.


मोठ्या बंदुका लपवण्यासाठी गाडीत चोरकप्पा

या बोलेरो गाडीतून पोलिसांनी २५ रायफल्स, १७ रिव्हॉल्व्हर्स, २ विदेशी पिस्तुलं, १ मशीन गन आणि ४१४६ जिवंत काडतुसं हस्तगत केली. यावेळी मोठ्या बंदुका लपवण्यासाठी गाडीमध्ये विशेष कप्पे करण्यात आल्याचं देखील पोलिसांच्या लक्षात आलं. २००६ साली औरंगाबादमध्ये पकडण्यात आलेल्या शस्त्रसाठ्यानंतर पकडण्यात आलेला सगळ्यात मोठा शस्त्रसाठा असल्याचं समजतंय.


शस्त्रसाठा येत होता मुंबईच्या दिशेने!

पकडण्यात आलेले सलमान खान, बदरी जुमन बादशहा हे दोघे मुंबईचे रहिवाशी असल्याने हा शस्त्रसाठा मुंबईच्या दिशेने येत असल्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. प्राथमिक माहितीनुसार कानपूर येथील हत्यारांच्या कारखान्यातून ही हत्यारं आणण्यात आल्याचं समजतंय. मात्र, एवढा शस्त्रसाठा नेमका कुठे चालला होता? आणि कशासाठी? हे मात्र सांगण्यास पोलिस तयार नाहीयेत. हत्यारांच्या दुकानावर दरोडा टाकून एवढा शस्त्रसाठा पळवण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच, मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याचा तर कट नव्हता ना? असाही संशय व्यक्त केला जात आहे.हेही वाचा

ड्रग्स तस्करीसाठी 'तो' वापरायचा यू ट्यूब


संबंधित विषय
ताज्या बातम्या