धक्कादायक, इंजिनीअर बनला सोने तस्कर!


धक्कादायक, इंजिनीअर बनला सोने तस्कर!
SHARES

उच्च शिक्षण पण हाताला काम नाही, ही देशात काही वर्षांपूर्वी असलेली स्थिती अजूनही बदललेली नाही. त्यामुळेच बेरोजगारांमध्ये पदवीधारकांच्या जोडीला इंजिनीअर्सचीही भर पडू लागली आहे. परिणामी झटपट पैसा कमावण्याच्या नादात हे बेरोजगार तरूण वाम मार्गाकडे वळू लागले आहेत. त्याचाच फायदा घेत सोने तस्कर नवोदीत इंजिनीअर्संना आपल्या जाळ्यात ओढू लागल्याचं पोलिसांच्या कारवाईतून पुढं आलं आहे.


काय आहे प्रकरण?

महसूल गुप्तवार्ता संचालनालया (डीआरआय)ने मुंबई विमानतळावर काही दिवसांपूर्वीच ५० किलोच्या सोन्यासह दोघांना अटक केल्यानंंतर विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. याच दरम्यान ११ किलो सोने तस्करीप्रकरणी बुधवारी 'डीआरआय'ने एका मॅकेनिकल इंजिनीअर तरुणाला अटक केली. मंगेश मेस्त्री (३०) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांंनी त्याच्या घरातून २५ लाख रुपयांची रोकड आणि २२०० दिऱ्हाम हस्तगत केले आहेत. तर चौकशीसाठी त्याचा मोबाइलही हस्तगत करण्यात आल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.


'असा' आला तस्करांच्या संंपर्कात

माटुंगा परिसरात राहणारा मंगेश मेस्त्री बेरोजगार असल्याने नोकरीच्या शोधात होता. अशातच त्याची ओळख युसूफ नावाच्या व्यक्तीशी झाली. त्यावेळी आखाती देशातून येणाऱ्या मशिनींमध्ये सोन्याचे विविध पार्ट बसवून त्यावर रंगरंगोटी करून तो सोन्याची तस्करी करायचा. प्रत्येक मशिनीमागे त्याला ३५ हजार रुपये मिळायचे. महिन्याला ६ ते ७ वेळा सोने तस्करी करून तो काही लाख रुपये कमवायचा. एका कंपनीत महिनाभर काम करून काही हजार रुपये पदरात पाडून घेण्यापेक्षा तस्करीतून लाखो रुपये मिळत असल्याने तो झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्नं पाहू लागला.


'असं' पकडले सोने

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गोमध्ये कुरिअरद्वारे आलेल्या यंत्रांमध्ये सोने लपवून आणल्याची माहिती 'डिआरआय'ला मिळाली होती. त्यानुसार 'डीआरआय'च्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून ११ किलो सोने मंगळवारी जप्त केले. शंकर इंटरप्रायजेस कंपनीच्या नावाने आलेल्या या कुरिअरमधील यंत्रांमध्ये मेकॅनिकल क्लॅम्प, कनेक्टर, नट आदींंमध्ये शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला होता.


गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी मंगेशला अटक केल्यानंतर त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच अशा प्रकारच्या तस्करीत आता मोठ्या प्रमाणात मॅकेनिकल इंजिनीअर तरुणांचा वापर होत असल्याचं अधिकाऱ्यांना सांगितलं. दुबईवरून यंत्र पाठवण्यात येत असल्याचं दाखवून त्यातील सुट्या भागांमध्ये सोने बसवण्यासाठी या इंजिनीअर तरुणांचा वापर केला जात असल्याची कबुली अधिकाऱ्यांसमोर मंगेशने दिली आहे.



हेही वाचा-

...आणि वॉशिंग मशीनमध्ये लपलेला चोर अलगद सापडला!

सुकापाशाच्या बापालाही खंडणीच्या गुन्ह्यात अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा