...आणि वॉशिंग मशीनमध्ये लपलेला चोर अलगद सापडला!

जुहू येथे विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या एका आरोपीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी चक्क वॉशिंग मशीनचा आधार घेतला होता. वॉशिंग मशीनमध्ये पूर्णत: अंग लपवणे शक्य नसल्यामुळे त्याने धुण्याचे कपडे अंगावर घेतले होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या अचूकतेमुळे त्या आरोपीला लपण्यात फारसे यश मिळाले नाही.

...आणि वॉशिंग मशीनमध्ये लपलेला चोर अलगद सापडला!
SHARES

चित्रपटात जेव्हा आरोपीला पकडण्यासाठी पोलिस घराची झडती घेतात, त्यावेळी चोर घरातील कपाटात, पोटमाळ्यावर किंवा अडगळीच्या जागी जाऊन लपतो. मात्र, घरातील वॉशिंग मशीनमध्ये चोर लपल्याचं ऐकलंय का हो तुम्ही?

जुहू येथे विविध गुन्ह्यांत फरार असलेल्या एका आरोपीने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी चक्क वॉशिंग मशीनचा आधार घेतला होता. वॉशिंग मशीनमध्ये पूर्णत: अंग लपवणे शक्य नसल्यामुळे त्याने धुण्याचे कपडे अंगावर घेतले होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या अचूकतेमुळे त्या आरोपीला लपण्यात फारसे यश मिळाले नाही.


मंत्र्यांशी मैत्रीच्या बाता!

मूळचा उत्तर भारतीय असलेला आरोपी मनोज तिवारीने १९९९ मध्ये आझाद मैदान पोलिस ठाणे परिसरात स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. शहरातील अनेक मंत्र्यांशी आपली मैत्री असल्याच्या बाता तो करत असे. या दरम्यान शहरातील चार ते पाच तरुणांना बीएडसाठी अॅडमिशन नव्हते. हे विद्यार्थी त्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याने प्रत्येकाकडून काही हजार रुपये घेत त्यांना बिहारच्या झाशी युनिव्हर्सिटीमध्ये अॅडमिशन करून देतो, असे सांगितले.

मात्र, दिलेली मुदत संपूनदेखील त्या मुलांचे अॅडमिशन झाले नाही. तर पैसे खाऊन मनोज फरार झाल्याचे कळल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, जामिनावर मनोज बाहेर आला. जामिनावर बाहेर असलेल्या मनोजने २००२ नंतर न्यायालयात हजेरी लावणे बंद केले. त्यावेळी न्यायालयाने त्याच्या विरोधात अटक वॉरंट काढले.


पोलिस तीन तास तिवारीच्या दरवाज्यात

दरम्यान, मनोज आपल्या पत्नीसह जुहू येथील एका हायप्रोफाईल सोसायटीत रहात असल्याची माहिती आझाद मैदान पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस साध्या वेशात मनोज रहात असलेल्या इमारतीखाली पोहोचले. इंटरकॉमद्वारे पोलिसांनी मनोज घरात असल्याची खात्री करून घेत त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. काही पोलिस खाली, तर काही त्याच्या घरी त्याला पकडण्यासाठी गेले. त्यावेळी दार त्याची पत्नी अॅड. उषा तिवारीने उघडले.

पोलिसांनी आपण मनोजला अटक करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. त्यावेळी पेशाने वकील असलेल्या उषाने पोलिसांना दरवाजावर तीन तास रोखून धरत घरात प्रवेश दिला नाही. त्यामुळे आझाद मैदान पोलिसांनी स्थानिक जुहू पोलिसांना या घटनेची माहिती देत मदतीसाठी बोलावून घेतले.


नवऱ्याला अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना दरवाजावरच अडवून धरत, आरोपीची पत्नी अॅड. उषा तिवारी आणि मनोज तिवारी यांच्यावर जुहू पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

सुनील घोसाळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, जुहू पोलिस ठाणे


...आणि मनोज घुसला वॉशिंग मशीनमध्ये!

दारात अटक करण्यासाठी पोलिस आल्याचे कळल्यानंतर मनोज तिवारीच्या पायाखालची जमीनच सरकली. इमारतीखाली ही पोलिसांचा राबता पाहून तिवारी घरात लपण्यासाठी जागा शोधत होता. मात्र, घरातील कपाटात किंवा बेडरूममध्ये लपण्यासाठी त्याला जागा मिळत नव्हती. त्यावेळी त्याची नजर वॉशिंग मशीनवर पडली. सात टनच्या वॉशिंग मशीनमध्ये पूर्णत: अंग लपवणे अशक्य असल्याने धुण्यासाठी काढलेले कपडे अंगावर घेऊन तो वॉशिंग मशीनमध्ये बसला.

जुहू पोलिस आल्यानंतर महिला पोलिसांच्या मदतीने आझाद मैदान पोलिसांनी मनोज तिवारीच्या घराची झडती घेतली. मात्र, मनोज तिवारी कुठेही आढळून आला नाही. इमारतीच्या १२ व्या माळ्यावरून उडी मारून पळणे अशक्य होते. घरातील कोपरा न कोपरा शोधून ही तिवारी हाती न लागल्याने पोलिस ही बुचकळ्यात पडले. त्याचवेळी उभा राहून कंटाळा आल्याने एक अधिकारी वॉशिंग मशीनला टेकून उभा राहिला. त्यावेळी त्याचा हात वॉशिंग मशीनवर ठेवलेल्या कपड्यांवर पडल्यानंतर काही तरी कडक वस्तू त्याच्या हाताला लागली. त्याने कपडे बाजूला केल्यानंतर वॉशिंग मशीनमध्ये तिवारी लपल्याचे आढळून आले.


पुण्यातही करोडोंची फसवणूक

मनोजच्या अटकेनंतर आझाद मैदान पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता. मनोजने २०१३ मध्ये पुण्यात ही सरकारी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत करोडो रुपये लाटल्याचे उघडकीस आले. पुण्यात लाल बत्तीच्या गाडीतून फिरत सरकारी कर्मचाऱ्यांशी जवळीकता साधत हवे त्या ठिकाणी पोस्टिंग करून देण्याच्या नावाखाली मनोजने हे पैसे घेतल्याचे तपासात पुढे आले आहे. मनोज तिवारीवर काही सरकारी कर्मचाऱ्यांनी पुण्याच्या वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.


व्यंगचित्रकार - प्रदीप म्हापसेकर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा