मुंबई विमानतळावर सोनं तस्करांना ओव्हर कॅान्फिडन्स नडला!


मुंबई विमानतळावर सोनं तस्करांना ओव्हर कॅान्फिडन्स नडला!
SHARES

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५० किलोच्या सोनं तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना त्यांचा ओव्हर कॉन्फीडन्स नडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचालनालय (डीआरआय)नं २ व्यावसायिकांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून ही बाब पुढे आली असून या तस्करीत एका पाकिस्तानी नागरिकाचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.



दुबईतून यंत्रात लपवून सोन्याची तस्करी करणारा मोहम्मद हनीफ हा मूळचा पाकिस्तानचा रहिवासी आहे. भारतीय व्यावसायिक गौतम पटेल याचा 'चॅम्पियन एक्झिम' नावाचं यंत्र बनवण्याचा व्यवसाय आहे. तर मिलन पटेल हा दुबईतील 'मेट्रो गोल्ड अॅण्ड डायमंड ज्वेलरी'मध्ये भागीदार आहे. दुबईत सोनं स्वस्त दरात मिळतं. पण भारतात सोन्याला चांगली किंमत आहे. शिवाय नोटबंदीनंतर झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी या दोन्ही भावांनी सोनं तस्करी करण्याचं ठरवलं. यादरम्यान त्या दोघांची ओळख दुबईत हनीफसोबत झाली होती.


अशी करत होते तस्करी

गौतमचा चॅम्पियन एक्झिम कंपनीला लागणारं यंत्र हानीफच्या मदतीनं दुबईतून कागदोपत्री मागवायचा. यातील यंत्राचा नटबोल्ड किंवा इतर पार्ट काढून त्याजागी त्याच मापाचं सोनं वितळवून नटबोल्ट किंवा इतर पार्ट बनवायचा. त्यावर यंत्राला लावण्यात आलेला रंग द्यायचा. त्यामुळे यंत्राला लावलेला नटबोल्ट सोन्याचा आहे, हे कुणाच्याही लक्षात यायचं नाही. मुंबईहून आलेलं यंत्र राजकोटला उतरवले जायचे. त्यातील सोनं काढून घेतल्यानंतर पुन्हा ते यंत्र काही त्रुटी असल्याचं दाखवून दुबईला पाठवले जायचे. त्यानंतर या यंत्राचा वापर पुन्हा तस्करीसाठी केला जायचा. काढून घेतलेलं सोनं राजू नावाच्या एंजटच्या माध्यमातून भारतीय बाजारात विकलं जात होतं. एक किलो मागे या दोन्ही व्यावसायिकांना १ लाख ३० हजार रुपयांचा फायदा व्हायचा.



ओव्हर कॉन्फिडन्स नडला

या तस्करांचं सर्व काही सुरळीत सुरू होतं. ६ महिन्यात या तस्करांनी तब्बल ३५० किलोचं सोनं भारतात छुप्या पद्धतीनं आणल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पहिल्यांदा तस्करी करताना हनिफनं मागवण्यात आलेल्या प्रत्येकी ८ यंत्रांमध्ये अर्धा किलो सोनं लपवून आणलं होतं. २ ते ३ ट्रीप अर्धा किलो सोन्याची तस्करी केल्यानंतर भारतीय विमातळावरील सुरक्षा फारच कमकुवत असल्याचं मत त्यांनी बनवलं. त्यानंतर त्यांनी प्रत्येकी आठ मशिनीत १ किलो सोनं लपवून आणण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे चार ते पाच वेळा सोनं छुप्या पद्धतीने आणल्यानंतर विमानतळावर कुणीही लक्ष देत नसल्यानं ३५ ते ४० किलो सोनं एका वेळी आणायचं ठरवलं. त्यानुसार मशिनमधून ते ३५ ते ४० किलो सोनं एकावेळी आणू लागले. मात्र, त्यांचा हाच ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडला. वारंवार एकाच कंपनीच्या यंत्रांमध्ये त्रुटी येत असल्यामुळे डीआरआयनं त्याकडे लक्ष केंद्रीत केल्यानं त्यांचा डाव फसला. हे सर्व सोनं साऊथ आफ्रिकेतून विकत घेत असल्याचं तपासात पुढं आलं आहे.


आरोपी अटकेत

सोनं तस्करीप्रकरणी डीआरआयनं गौतम पटेल (३०), मिलन पटेल (३६) या दोन भावांना अटक केली आहे. या दोघांकडून पोलिसांनी आतापर्यंत ४६ लाख ५६ हजारांचे परकीय चलन हस्तगत केले आहेत. १६ डिसेंबरला आरोपींनी तस्करीतील ३५ किलो सोनं (१० कोटी), आणि २० डिसेंबरला ४० किलो सोन (११ कोटी ४० लाख) अहमदाबादला विकल्याची कबुली दिली आहे. ५० किलोच्या सोनं तस्करीची बाब उघडकीस आल्यानंतर तस्करांच्या मुस्क्या आवळण्यासाठी डीआरआयनं आता विमानतळावर गस्त वाढवली आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा