जोगेश्वरीतील हाॅटेलमध्ये आढळला आयआयटीतील विद्यार्थ्याचा मृतदेह

गावाला जात असल्याचं सांगून निघालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) चा विद्यार्थी जयदीप स्वैन (२२) याचा मृतदेह सोमवारी जोगेश्वरीच्या हाॅटेलमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. झोपेच्या गोळ्यांचं अतिसेवन करून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात असून या प्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावी जाण्यासाठी निघाला

मूळचा छत्तीसगडमधील असलेला जयदीप नुकताच शिकण्यासाठी मुंबईत आला होता. त्याने जुलै महिन्यात मुंबई आयआयटीत प्रवेश घेतला होता. इथं तो कम्प्युटर सायन्समध्ये एमटेक करत होता. शुक्रवारी सायंकाळी आयआयटीच्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या जयदीपने त्याच्या खोलीत राहणाऱ्या मित्रांना गावाला जात असल्याचं सांगितलं होतं.

खोलीतून प्रतिसादच नाही

मात्र जयदीप गावी न जाता शुक्रवार ३१ आॅगस्टपासून जागेश्वरीतील हाॅटेलमध्येच थांबला होती. हाॅटेलच्या रजिस्टरमध्ये तशी नोंदणीही पोलिसांना आढळून आली आहे. सोमवारी हाॅटेलमधील कर्मचारी जयदीपकडे काही हवं आहे का? याची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी जयदीपच्या खोलीतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर हाॅटेलमधील इतर ग्राहकांनी तिसऱ्या मजल्यावरून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यानंतर हाॅटेलच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला. तेव्हा जयदीपचा मृतदेह कर्मचाऱ्यांना आढळून आला.

गोळ्या आढळल्या

यानंतर हाॅटेल व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावलं. प्राथमिक तपासणीत पोलिसांना मृतदेहाच्या शेजारी कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. परंतु, त्याच्या मृतदेहाशेजारी बऱ्याच गोळ्या सापडल्या. तणाव दूर करण्यासाठी जयदीप या गोळ्या घेत असावा किंवा गोळ्याचा ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या गोळ्या तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आल्या असून याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती अंबोली पोलिसांनी दिली आहे. जयदीपच्या वडिलांशी पोलिसांनी संपर्क साधला असून अधिक तपास सुरू आहे.


हेही वाचा-

वृद्ध मालकिणीला मारण्यासाठी रोज जेवणातून विष

अमरावतीत शिजला श्याम मानव यांच्या हत्येचा कट


पुढील बातमी
इतर बातम्या