स्टिरॉईड घेणं बेतलं जीवावर, अतिसेवनाने तरूणाचा मृत्यू

चांगली शरीरयष्टी कमावण्यासाठी स्टिरॉईड (Steroid) घेणं एका तरूणाच्या जीवावर बेतलं आहे. स्टिरॉईडचं अतिसेवन (Over serving) केल्याने नावेद जमील खान (२३) या तरूणाचं मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आली आहे. नावेद मुंब्रा (Mumbra) येथे राहतो. ठाणे (Thane) शहरात होणाऱ्या शरीरसौष्ठव स्पर्धेत (Bodybuilding Competition) तो सहभागी होणार होता. त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. 

नावेदची बॉडीबिल्डर (Bodybuilder) होण्याची इच्छा होती.  शुक्रवारी रात्री ताप आल्याने कुटुंबियांनी त्याला स्थानिक डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी काही चाचण्या केल्यानंतर त्याला बिलाल रुग्णालयात नेण्यास सांगितलं.  बिलाल रुग्णालयात काही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांमधून  नावेदला हिपॅटायटीस बी (Hepatitis b) हा आजार झाल्याचं समोर आलं. त्याच्या शरीरामधील कोलेस्ट्रॉलचं (Cholesterol) प्रमाणही अधिक असल्याचं  समजलं. व्यायाम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या औषधांमधील ग्लुकोकॉट्रीकॉइड्स या संप्रेरकांमुळं शरिरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितलं.

नावेदची त्वचा पिवळी पडून त्याच्या पोटात काहीच राहत नव्हतं.  त्याला आयसीयू (icu) मध्ये ठेवण्यात आलं. त्याचे यकृत प्रत्यारोपण करण्याची गरज असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. कुटुंबाने नावेदला केईएम रुग्णालयात (KEM Hospital) आणलं. पण तोपर्यंत त्याची प्रकृती खूपच खालावली होती. फुफ्फुस खराब झाल्याने त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. अखेर रविवारी त्याचा मृत्यू झाला. नावेद ऑनलाइन स्टिरॉईड मागवायचा अशी माहिती त्याच्या आईने दिली आहे.


हेही वाचा -

ट्रकच्या धडकेनं कोसळला पुलाचा सांगाडा, २ जण गंभीर जखमी

CAA विरोधात भडकाऊ भाषण करणाऱ्या डॉ कफील खान यांना मुंबईतून अटक


पुढील बातमी
इतर बातम्या