अवघ्या ३ मिनिटात कार चोरी, ६० वर्षीय कार चोराला अटक

अवघ्या तीन मिनिटात गाडी चोरणाऱ्या सराईत आरोपीस गुन्हे शाखा ९ च्या पोलिसानी अटक केली आहेयशवंत शिगवण (६०) असं या आरोपीचे नाव आहे. या आरोपीवर १८ गुन्ह्यांची नोंद असून गुन्हे शाखेकडील ४ गुन्ह्यात पोलिसांना तो हवा होता. मागणीनुसार गाडी पुरवणाऱ्या सराईत आरोपींपैकी त्याचा पहिला नंबर लागत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

उच्चभ्रू वस्तीत चोरी 

मुंबईतील रस्त्यांवरून प्रत्येक दिवसाला सरासरी ११ गाड्या चोरीला जात असून, कार चोरांचा शोध घेणं पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असते. वांद्रेच्या खारदांडा परिसरात राहणारा शिगवण उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या गाड्या अवघ्या तीन मिनिटात चोरायचा. या चोरीच्या गाड्या तो यूपी, बिहार मधील टोळीच्या हवाली करून बक्कळ पैसे कमवायचा. मेकॅनिकचं काम करणाऱ्या शिगवणने पैशांच्या अडचणीमुळे चोरीचा मार्ग पत्करल्याचे सांगितलं. 

१४ गुन्ह्यात शिक्षा 

अवघ्या तीन मिनिटात कारची बनावट चावी बनवून तो गाड्या चोरायचा. गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांच्या रडारवर शिगवण होता. त्याच्यावर १९९२ पासून एकूण १८ गुन्ह्यांची नोंद आहे. यातील १४ गुन्ह्यात शिगवण हा शिक्षा भोगून बाहेर आला होता. मात्र शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरही त्याने चोरी करणं काही थांबवलं नव्हतं.

परराज्यात विक्री

वांद्रे परिसरातील ४ महागड्या गाडी चोरीमध्ये पोलिस त्याला शोधत होते. मुंबईतून चोरण्यात येणाऱ्या कार शिगवण हा मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, नोएडा, केरळा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, कोलकाता, झारखंड, ओडिशा, आसाम व नेपाळमध्येही विकायचा. कार चोरी बाजारात तवेरा, स्कॉर्पिओ, बोलोरे, क्वालिस, पजेरो, मारुती, सँट्रो आदी गाड्यांना अधिक मागणी आहे.

दिल्ली आघाडीवर 

मुंबईत रोज ११ गाड्या चोरीला जातात. मात्र, देशातील इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे. दिल्लीत दररोज सरासरी ४० गाड्या चोरीला जातात. त्यापाठोपाठ बंगळुरु आघाडीवर असून तेथे दिवसाला सरासरी १२ गाड्या चोरीला जात असल्याचं आकडेवारी सांगते


हेही वाचा -

नवऱ्याच्या अट्टहासापायी हेजलने मूल पळवलं

मालेगाव बाॅम्बस्फोटातील ४ आरोपींना जामीन मंजूर


पुढील बातमी
इतर बातम्या