नवऱ्याच्या अट्टहासापायी हेजलने मूल पळवलं

डोनाल्ड आणि हेजलला मूल होत नसल्याने त्याने तिला सोडून देण्याचीही धमकी दिली होती. त्यामुळे हेजल मानसिक तणावात होती. त्याचदरम्यान तिने भितीपोटी डोनाल्डला आपण गर्भवती असल्याचे सांगितले.

SHARE

मूल होत नसल्यामुळे नवऱ्याने वेगळे होण्याची धमकी दिल्यामुळे मूल चोरी केल्याची कबुली हेजल डोनाल्ड कोरिया (३७) या महिलेने पोलिसांना दिली आहे. नायर रुग्णालयातून मूल पळवल्याप्रकरणी हेजलला पोलिसांनी अटक केली आहे. मागील आठवड्यापासून हेजल या मुलावर नजर ठेवून होती. मूल चोरी केल्यानंतर मुलाच्या बेंबीतून रक्त येऊ लागल्यामुळे हेजल त्याला घेऊन व्ही.एन.देसाई रुग्णालयात आली. त्या ठिकाणी गस्तीवर असलेल्या दत्तात्रय गायकवाडला तिच्यावर संशय आला आणि हेजलची चोरी पकडली गेली.


गरोदरपणाचा बहाणा

मूळची पालघरची असलेल्या हेजलचे पहिले लग्न झाले असून पहिल्या पतीपासून तिला एक मुलगी आहे. पतीशी काडीमोड घेतल्यानंतर तिने डोनाल्डसोबत लग्न केले. डोनाल्ड हा शेअर बाजारात कामाला आहे. डोनाल्ड आणि हेजलला मूल होत नसल्याने त्याने तिला सोडून देण्याचीही धमकी दिली होती. त्यामुळे हेजल मानसिक तणावात होती. त्याचदरम्यान तिने भितीपोटी डोनाल्डला आपण गर्भवती असल्याचे सांगितले. डाॅक्टरांकडे तपासणीसाठी जात असल्याचे सांगून हेजल शासकीय रुग्णालयात मूल चोरीच्या उद्देशाने जायची.


बॅगमधून मूल पळवले

 मागील आठवड्यात ती नायर रुग्णालयात आली असताना वार्ड नं ७ मध्ये शीतल साळवी यांच्या मुलावर तिची नजर पडली. शीतल ज्या बेडवर अॅडमिट झाली होती तो बेड वार्डच्या दरवाजाच्या जवळ होता. मागील तीन ते चार दिवसांपासून शीतलला भेटायला येणाऱ्या पाहुणे मंडळींवर हेजल लक्ष ठेवून होती. त्यानुसार गुरूवारी हेजलने शीतलसोबत थांबलेली तिची मावशी तोंड धूण्यासाठी गेलेली पाहून तसंच शीतल गाढ झोपेत पाहून मूल खांद्यावर अडकवणाऱ्या बॅगमधून पळवले.


सतर्कतेमुळे चोरी उघडकीस 

हेजल त्या मुलाला घेऊन पालघरला निघाली होती. त्याच वेळी मुलाच्या बेंबीतून रक्तस्त्राव होऊ लागल्याने  व्ही.एन.देसाई रुग्णालयात उपचारासाठी आली. त्यावेळी गस्तीवर असलेल्या दत्तात्रय गायकवाडला पाहून हेजल गडबडली. तसंच मूल चोरी करतानाचा व्हिडिओ पोलिसांच्या सर्व ग्रुपवर आल्यामुळे गायकवाडलाही हेजलवर संशय आला. त्याने हेजलजवळ चौकशी केली. त्यावेळी हेजलने घरीच प्रसुती झाली असून रुग्णालयात उपचारासाठी आल्याचं सांगितलं.. मात्र गायकवाडने डाॅक्टरांकडे हेजलच्या प्रसुतीबाबत चौकशी केली असता हेजलची चोरी पकडली गेली. गायकवाडच्या सतर्कतेमुळे हेजल पोलिसांच्या तावडीत सापडल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  गायकवाडने याबाबत पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर आग्रीपाडा पोलिसांनी मुलाचा आणि हेजलचा ताबा घेतला.हेही वाचा  -

मालेगाव बाॅम्बस्फोटातील ४ आरोपींना जामीन मंजूर

नायर रुग्णालयातून ५ दिवसांचे बाळ चोरीला
संबंधित विषय
ताज्या बातम्या