२२ वर्षानंतर थापा टोळीतील गुंडास अटक

हत्या, दरोडे, दंगली आणि खंडणीच्या गंभीर गुन्ह्यांतील एका आरोपीला तब्बल २२ वर्षानंतर अटक करण्यात अाली आहे. अनिल गवंडे असं या आरोपीचे नाव असून तो नाव बदलून गुजरातच्या वलसाड भागात वावरत होता.

जामिनावर सुटून फरार

नव्वदीच्या दशकात पूर्व उपनगरातील भांडुप परिसरात थापा गँगची मोठी दहशत होती. या टोळीने केलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी गवंडेचा मोठा वाटा होता. १९९६ मध्ये मुलुंड परिसरात या टोळीने एकाची खंडणीसाठी हत्या केली. या हत्याप्रकरणात पोलिसांनी ७ जणांना अटक केली होती. कित्येक महिने या हत्येची सुनावणी सुरू राहिल्यानंतर काही महिन्यांनी गवंडेला न्यायालयाने जामीन मंजूर केला. जेलबाहेर आल्यानंतर गवंडे गायब झाला. जामिनाची मुदत संपल्यानंतरही गवंडे हजर न झाल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अनेक वर्ष पोलिस त्याच्या मागावरच होते. मात्र, गवंडे काही पोलिसांना सापडत नव्हता.

इतर ३ गुन्हे कबूल

२२ वर्षांनी फरार गवंडे गुजरातच्या वलसाड भागात असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. वलसाडच्या उमरगाव येथे गवंडे टिशू पेपर बनवण्याच्या कंपनीत कामाला राहिला होता. त्यानुसार गुन्हे शाखा ७ चे पोलिस त्याला पकडण्यासाठी वेष बदलून गेले. गवंडेला ताब्यात घेतल्यानंतर त्याने इतर ३ गुन्ह्यांची कबुली दिली असल्याची माहिती गुन्हे विभागाचे पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली.


हेही वाचा - 

मुन्ना झिंगाडा भारतीयच, छोटा राजनचा जबाब आला कामी

डोंबिवलीतील सख्ख्या भावांचं मलेशियात अपहरण, १ कोटींच्या खंडणीची मागणी


पुढील बातमी
इतर बातम्या