थर्टी फर्स्टच्या नशेवर पोलिसांचा वाॅच, ३ अंमली पदार्थ तस्कर जेरबंद

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर युनिटने अंमल पदार्थांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. आशा उर्फ नम्रता दिलीप कदम (३२), रामू नायर (२२) आणि मोहम्मद शकील उर्फ गुड्डू शराफत हुसेन अन्सारी (४९) अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघेही थर्टी फर्स्टच्या निमित्ताने शहरात अंमली पदार्थाची तस्करी करत होते.

कफ सिरपच्या बाटल्या हस्तगत

हे तिघेही कुर्लाच्या सतीश नगर आणि विनोबा भावे नगर परिसरात राहतात. पोलिसांनी या तिघांजवळून १ लाख ३२ हजार रुपये किंमतीच्या ६६३ कफ सिरपच्या बाटल्या हस्तगत केल्या आहेत.

हे तिघेही जण थर्टी फर्स्टच्या निमित्ताने शहरात अंमली पदार्थांची तस्करी करत होते. यांत एका महिला तस्कराचाही सहभाग असल्याचं पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी सांगितलं.

सर्व काही थर्टी फर्स्टसाठी

थर्टी फर्स्ट पार्टीचा माहौल नशीला बनवण्यासाठी अनेक तस्कर मुंबईबाहेरून अंमली पदार्थ मुंबईत आणत असतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विभागाने कंबर कसली असून, दोन आठवड्यांत ३० हून अधिक अंमली पदार्थ तस्करांना अटक करत त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यात आणखी तिघांची भर पडली आहे.

या तस्करांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध टोल नाक्यांवरील सुरक्षाही वाढवली आहे.


हेही वाचा-

थर्टी फर्स्टला उगाच 'लफडा' नको, शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त

एटीएम लुटणाऱ्या रोमानियन चोरांना दिल्लीत अटक


पुढील बातमी
इतर बातम्या