अपहरण करून महिलेला लुटलं; रिक्षाचालकास अटक

दहिसरमध्ये राहणाऱ्या महिलेचं अपहरण करून तिला मारहाण करून लुटणाऱ्या एका सराईत रिक्षा चालकाला आरोपीला गुन्हे शाखा ११ च्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. जिग्नेश जितेंद्र राजानी (३१) असं या आरोपीचं नाव आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुढील तपासासाठी त्याचा ताबा बोरिवलीच्या एमएचबी पोलिसांकडे दिला आहे.

मुलाचा मित्र असल्याची बतावणी

दहिसर परिसरात राहणाऱ्या ६५ वर्षीय महिला २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. घरी परतण्यासाठी त्या दहिसर (प) येथील बस स्टाॅपवर उभ्या होत्या. यावेळी जिग्नेश रिक्षा घेऊन त्यांच्याजवळ आला. त्याने महिलेस आपण त्यांच्या मुलाचा मित्र असल्याचं सांगत घरी सोडण्यासाठी आग्रह केला. त्यानुसार महिला त्याच्या रिक्षात बसल्या. रिक्षात बसल्यानंतर त्याने त्यांच्या मुलाचं एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचं सांगितलं. तसेच महिलेला विश्वास बसावा यासाठी जिग्नेशने ते दोघे सध्या एका हाॅटेलवर थांबले असल्याचं महिलेला सांगितलं. मुलाच्या घृणास्पद कृत्याचा राग आल्याने महिला जिग्नेशसोबत जाण्यास तयार झाली. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत जिग्नेशने रिक्षा घोडबंदरमार्गे भाईंदरहून गुजरातच्या दिशेने नेली. 

निर्जनस्थळी लुबाडून निर्वस्त्र 

काही अंतरावर गेल्यानंतर एका निर्जनस्थळी जिग्नेशने रिक्षा थांबवून महिलेला दागिने काढून देण्यास धमकावले. आपली फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर महिलेने आरडा ओरडा करण्यास सुरूवात केली. त्यावेळी जिग्नेशने महिलेला मारहाण करून तिच्याजवळील मौल्यवान दागिने काढून घेतले. मारून, लुबाडूनही जिग्नेशची हौस न भागल्या त्याने महिलेला निर्वस्त्र करत विनयभंगही केला. यावेळी एक गाडी येत असल्याचं पाहिल्यानंतर जिग्नेश पळून गेला.  रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने महिलेने घर गाठत एमएचबी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. घाबरलेल्या महिलेला कांदिवलीच्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं अाहे.

सीसीटिव्हींच्या मदतीने ओळख

गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा पोलिस ठाण्याकडून गुन्हे शाखा ११ कडे वर्ग करण्यात आला.  गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महिलेकडे विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला इतकी घाबरली होती की तिने पोलिसांना काहीच माहिती दिली नाही. त्यानंतर पोलिसांनी रस्त्यावरील शेकडो सीसीटिव्हींच्या मदतीने जिग्नेशची ओळख पटवत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. जिग्नेशने गुन्ह्याची कबूली दिल्याची माहिती गुन्हे शाखा ११ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी दिली. एमएचबी पोलिस ठाण्यात जिग्नेश विरोधात विनयभंग, लूट आणि फसवणूकीचा गुन्हा नोंदवला अाहे.


हेही वाचा -

फारुख देवडीवालाची पाकिस्तानात हत्या?

मुंबईकरांनो सावधान! दुधभेसळखोरांचा सुळसुळाट; दुसऱ्या रॅकेटचा पर्दाफाश


 

पुढील बातमी
इतर बातम्या