Advertisement

मुंबईकरांनो सावधान! दुधभेसळखोरांचा सुळसुळाट; दुसऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आणि गुन्हे शाखा-९ ने बुधवारी २६ सप्टेंबरला सांताक्रुझ इथं संयुक्तिक कारवाई करत दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पंधरा दिवसांत दूध भेसळ करणाऱ्या दोन रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानं मुंबईत दूध भेसळखोरांचा सुळसुळाट असून मुंबईकराच्या जिवाशी ते खेळ करत असल्याचं पुन्हा समोर आलं आहे.

मुंबईकरांनो सावधान! दुधभेसळखोरांचा सुळसुळाट; दुसऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
SHARES

देशभरातील तब्बल ६८ टक्के दूध भेसळयुक्त असतं. तर २०२५ पर्यंत भेसळयुक्त दुधाच्या सेवनामुळं ८७ टक्के भारतीय कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला बळी पडतील, असा धक्कादायक खुलासा नुकताच समोर आला आहे. या खुलाशामुळं अनेकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. असं असताना अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आणि गुन्हे शाखा-९ ने बुधवारी २६ सप्टेंबरला सांताक्रुझ इथं संयुक्तिक कारवाई करत दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.  पंधरा दिवसांत दूध भेसळ करणाऱ्या दोन रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानं मुंबईत दूध भेसळखोरांचा सुळसुळाट असून मुंबईकराच्या जिवाशी ते खेळ करत असल्याचं पुन्हा समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांनो सावधान! असं सांगण्याची वेळ आली आहे.
१८ सप्टेंबरला पहिली कारवाई

१८ सप्टेंबरला पहाटे पाचच्या सुमारास एफडीएने खार पश्चिम इथल्या झोपडपट्ट्यांमध्ये दोन ठिकाणी छापा टाकत दुधभेसळ करणारं रॅकेट उद्धवस्त  केलं होतं. पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवत चार जणांना अटक केली होती. तर एक जण फरार होता. तर यावेळी तब्बल ४५० लीटर दूध जप्त करत नष्ट केलं होतं. अमुल आणि गोकुळसारख्या ब्रॅण्डेड दुधाच्या पिशव्या फाडून त्यातील निम्म्याहून अधिक दूध काढून त्यात पाणी मिसळून पुन्हा पिशव्या रिपॅक करून भेसळयुक्त दूध ग्राहकांना विकलं जात असल्याचं या कारवाईतून समोर आलं होतं.


अमुल, महानंदमध्ये भेसळ

या कारवाईनंतर बुधवारी, २६ सप्टेंबरला सांताक्रुझ पूर्व इथं दोन ठिकाणी एफडीए आणि गुन्हे शाखा ९ ने छापा टाकत आणखी एक दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सांताक्रुझ पूर्व येथील रू. नं. २५९, सुभाष नगर झोपडपट्टीतील एका घरात अमुल आणि महानंदसारख्या बड्या ब्रॅण्डच्या दुधाच्या पिशव्या फोडून त्यातील दूध काढून त्यात पाणी मिसळून त्या रिपॅक करताना भेसळखोरांना रंगेहाथ पकडलं आहे. तर दुसरा छापा सांताक्रुझ पूर्व येथील लोखंडवाला चाळ, डावरी नगर इथल्या झोपडपट्टीतील एका घरात टाकण्यात आला असून इथंही अशाच प्रकारे दूध भेसळ केली जात होती.१०७१ लीटर दूध जप्त

सुभाष नगर इथून १५१ लीटर तर लोखंडवाला इथून ९२० लीटर दूध असं एकूण १०७१ लीटर इतकं दूध जप्त करत नष्ट कल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त (बृहन्मुंबई), अन्न,एफडीए यांनी दिली आहे. जप्त करून नष्ट  करण्यात आलेल्या दुधाची एकूण किंमत ४४ हजार ९८२ रुपये अशी आहे. १८ सप्टेंबरच्या कारवाईपेक्षा ही मोठी कारवाई अाहे. यावेळी चौघांना अटक करण्यात आली आहे.  आरोपींचा ताबा वाकोला पोलिसांना दिला असून अधिक तपास वाकोला पोलिसांसह गुन्हे शाखा-९ कडून सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेश देसाई, गुन्हे शाखा-९ यांनी दिली आहे.


६९०० रिकाम्या पिशव्या जप्त

परशूराम कमल्लापल्ली, नागराज मेडेबोयना, क्रिष्णा कमल्लापल्ली आणि लक्ष्मी मेडेबोयना अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. छापा टाकलेल्या ठिकाणाहून ६९०० दुधाच्या रिकाम्या पिशव्याही एफडीएनं जप्त केल्या आहेत. अमुल आणि महानंदच्या या दुधाच्या पिशव्या आहेत. त्यामुळे ग्राहकांनी दुधाच्या पिशव्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी आणि दुध खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी, असं आवाहन आढाव यांनी केलं आहे.हेही वाचा - 

Exclusive : नॅशनल पार्कमधील आदिवासी ४८० चौ. फुटाच्या रो-हाऊसमध्ये! म्हाडा बांधणार मरोळ-मरोशीत रो-हाऊस

सायन रुग्णालयात प्रसुतीगृहात झुरळांचा सुळसुळाट
संबंधित विषय
Advertisement