दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला उडवले, आरोपी अटकेत

दक्षिण मुंबईतल्या जे.जे. उड्डाणपुलावर एका दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला उडवल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली आहे. जे.जे. उड्डाण पुलावर दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही नियम पायदळी तुडवत हा दुचाकीस्वार पुलावर प्रवेश करत होता. मात्र, त्याला अडवायला गेलेल्या पोलिस शिपायालाच त्याने उडवले. या घटनेमध्ये पोलिस शिपाई उत्तम मस्के जखमी झाले आहेत. त्यांना जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असून पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली आहे.

जे. जे. उड्डाणपुलावर बाईकच्या शर्यती

जे. जे. मार्ग उड्डाणपूल वाहनांसाठी सुरू झाल्यानंतर रात्रीच्या वेळी मोकळ्या उड्डाणपुलावरून दुचाकींच्या शर्यती खेळल्या जात होत्या. त्यावेळी दुचाकींच्या अपघातात अनेकांचा मृत्यू झाला. अनेक अपघातात दुचाकीस्वार सुरक्षा कठडा ओलांडून खाली पडल्याच्याही घटना घडल्या. त्यानंतर या गोष्टीकडे मुंबई पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देत जे.जे. उड्डाणपूल दुचाकीस्वारांसाठी बंद केला.

काय घडलं उड्डाणपुलावर?

मात्र, तरीही अनेक दुचाकीस्वार नियम पायदळी तुडवत उड्डाणपुलावर दुचाकी नेत असल्यामुळे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना पोलिस गस्त ठेवण्यात आली. दरम्यान, सोमवारी पोलिस शिपाई उत्तम मस्के हे गस्तीला होते. त्यावेळी उड्डाणपूलावर दुचाकीस्वारांना जाण्यापासून मस्के रोखत होते. मात्र, तरीही एक दुचाकीस्वार वेगात मस्के यांच्या दिशेने आला.

मस्के यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अडवण्यासाठी आलेल्या मस्केंना त्याने धडक दिली. त्यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तोही खाली पडला. या अपघातात मस्केंच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. वेळीच गस्तीवरील इतर पोलिस मस्केंच्या मदतीला धावले. पोलिसांनी मस्केंना जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी नेले असून दुचाकीस्वार आरोपी जाधव याच्या विरोधात पायधुनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.


हेही वाचा

मुलुंडमध्ये 'गोलमाल'चा 'उंगलीमॅन'!

पुढील बातमी
इतर बातम्या