रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या नावाने फसवणूक करणारा अटकेत

रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या नावाने फसवणूक करणाऱ्या एका ठगास माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. ज्योतीकुमार अगरवाल असं या आरोपीचे नाव आहे. गोयल यांच्याशी जवळीक असल्याचं भासवण्यासाठी या ठगाने चक्क पियूष गोयल यांच्या नावाने बनावट ई-मेल आणि व्हाॅट्सअॅपचा वापरही केल्याचं समोर आलं आहे. 

कंत्राटाचं आमिष

लोअर परळ येथील जी.के. मार्गावरील मॅरेथाॅन इमारतीत राहणारे मनीष पटेल हे पर्यावरण सल्लागार आहेत. मनीष हे ज्योतीकुमार यांना फार पूर्वीपासून ओळखतात. १६ मार्च २०१८ रोजी ज्योतीकुमार मनीष यांंना भेटायला आला होता. त्यावेळी ज्योतिकुमारने आपले रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी घरचे संबध असून ओळखीवर 'सतत ' या योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांचे कंत्राट मिळवून देऊ असं सांगितलं.

बनावट ईमेल 

कंत्राट मिळवून देण्यासाठी थोडा खर्च करावा लागेल असं सांगत ज्योतीकुमारने सप्टेंबर २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान वेळोवेळी मनीष यांच्या कार्यालयात येऊन गोयल यांच्या जवळच्या व्यक्तींना दिवाळीभेट पाठवायची असल्याचे सांगून दीड लाख रूपये नेले. पटेल यांना खात्री पटावी म्हणून ज्योतीकुमारने पियूष गोयल यांच्या नावाने बनावट ई मेल बनवून त्यावर स्वत:ला मेल केला. तोच मेल खात्रीसाठी मनीष यांना पाठवला. एवढेच नव्हे तर गोयल यांच्या नावाने १ लाख ७५ हजार रुपये एनईएफटीद्वारे पाटवल्याचा खोटा मेसेजही मनीष यांना दाखवला.

कार्यालयात चौकशी

ज्योतीकुमार याच्या वागणुकीवर संशय आल्याने मनीष यांनी दुसऱ्या मित्राच्या मदतीने गोयल यांच्या कार्यालयात चौकशी केली  त्यावेळी पटेल यांना त्यांची फसवणूक झाल्याचं समजलं. त्यानंतर मनीष यांनी माटुंगा पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार माटुंगा पोलिसांनी ज्योतिकुमारला अटक केली.

सुरेश प्रभूंच्या नावाने फसवणूक 

केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांंच्या ओळखीने रेल्वेच्या तिकिट तपासणी (टीसी)  पदावर नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या जितेंद्र घाडी याला खार पोलिसांनी अटक केली आरोपीने प्रभू यांच्या नावाने व्हाॅट्सअॅपवर 'सुरेश प्रभू फॅन या नावाने ग्रुपही बनवला होता. नालासोपारात राहणारेे तक्रारदार विश्वनाथ गुरव यांना घाडीने या ग्रुपवर अॅड केले. या ग्रुपवर त्याने आपण मुंबई सेंट्रलच्या रेल्वे कार शेडमध्ये आॅफीस बाॅय म्हणून कामाला असून प्रभू यांच्याशी घरचे संबंध असून त्यांनीच कामाला ठेवल्याचं सांगितलं.

गुरव यांना घाडीकडे रेल्वेत नोकरीसाठी विचारणा केली. त्यावेळी घाडीने गुरव यांच्याकडून १ लाख ९ हजार रुपये घेतले. तसंच त्यांना रेल्वे अधिकाऱ्याचे बनावट सही शिक्का असलेले बनावट नियुक्ती पत्रकही दिले. हे लेटर त्याने ग्रुपवर टाकल्यावर इतरांनीही घाडीकडे नोकरीसाठी विचारणा करत त्याला पैसेही दिले. मात्र काम न झाल्याने फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी त्यांनी खार पोलिसात तक्रार नोंदवली.


हेही वाचा - 

इंडियन आयडाॅल अवंती पटेलला पावणे २ लाखांचा गंडा

बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या स्क्रिप्ट रायटरला अटक


पुढील बातमी
इतर बातम्या