इंडियन आयडाॅल अवंती पटेलला पावणे २ लाखांचा गंडा

सायन परिसरात राहणाऱ्या अवंतीला ३१ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी एक निनावी फोन आला. समोरील व्यक्तीने अवंतीला तुम्ही घेतलेलं बँकेचं कार्ड अद्याप सुरू का केलं नाही? असा सवाल केला.

इंडियन आयडाॅल अवंती पटेलला पावणे २ लाखांचा गंडा
SHARES

इंडियन आयडाॅल फेम गायिका अवंती पटेल हिला पावणे दोन लाख रुपयांना गंडा घालणाऱ्यास अटक करण्यात सायन पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणात सायन पोलिसांनी झारखंडच्या देवघर भागातून राजकुमार जयनारायन मंडल (२२) याला अटक केली आहे. फसवणुकीची रक्कम अद्याप हस्तगत केली नसून आरोपीच्या इतर सहकाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहे.


कसं ठकवलं अवंतीला?

देशभरात कॅशलेश व्यवहारांसाठी आग्रही असलेलं सरकार सायबर सुरक्षेबाबत मात्र कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याचं दिसून येत आहे. सायन परिसरात राहणाऱ्या अवंतीला ३१ डिसेंबर  २०१८ रोजी दुपारी एक निनावी फोन आला. समोरील व्यक्तीने अवंतीला तुम्ही घेतलेलं बँकेचं कार्ड अद्याप सुरू का केलं नाही? असा सवाल केला. अवंतीने त्याची विचारपूस केली असता त्याने स्वतःला बँकेचा अधिकारी असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर त्याने डेबिट कार्ड आॅनलाईन सुरू करण्यासाठी प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. अवंतीच्या बँकेतील पैसे आणि अकाऊंट नंबरची अचूक माहिती दिल्याने अवंतीचा त्याच्यावर विश्वास बसला.


दीड लाख काढले

त्यानंतर अवंती त्याला सहकार्य करू लागली. आरोपीने अवंतीला कार्डची एक्सपायरी डेट विचारत मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर सांगण्यास सांगितलं. तो ओटीपी सांगताच तिसऱ्या मिनिटाला ३ वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे अवंतीच्या खात्यातून दीड लाख रुपये काढण्यात आले.


बहिणीच्या खात्याचीही माहिती

एवढंच नाही तर हे पैसे पुन्हा खात्यावर आणण्यासाठी तसंच बँकेची प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी या चोरट्याने घरातील इतर सदस्यांच्या बँकेतील खात्याविषयी माहिती तिला विचारली. त्यानुसार अवंतीने आपल्या कार्डसाठी गॅरेंटर म्हणून त्याच बँकेच्या बहिणीच्या खात्याची माहिती चोरट्यांनी दिली. ही माहिती मिळताच चोरट्यांनी तिच्याही खात्यातून २० हजार रुपये काढले.


पेटीएमवर पैसे वळवले

कित्येक तास उलटल्यानंतरही पैसे खात्यावर जमा न झाल्याने अवंतीने पुन्हा त्या नंबरवर संपर्क केला असता तो फोन नंबर बंद येत होता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर अवंतीने सायन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा तपास करताना ज्या खात्यात चोरलेली रक्कम जमा झाली त्या खात्यातून दुसरीकडे रक्कम वळवण्यात आल्याचं आढळून आलं. त्याचा पोलिसांनी माग काढला. दोन ते तीन व्यवहारानंतर ती रक्कम पेटीएम खात्यावर वळवण्यात आला होती. त्यानुसार राजकुमार मंडलला झारखंडच्या देवधर या दुर्गम भागातून अटक केल्याचा माहिती सायन पोलिसांंनी दिली.



हेही वाचा - 

बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या स्क्रिप्ट रायटरला अटक

कर्ज थकवल्याने उन्मेष मनोहर जोशींची मालमत्ता जप्त




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा