मुंबईतील कांदिवली परिसरात ग्राहकानं डिलेव्हरी बॉयची दुचाकी पळविल्याची घटना उघडकीस आली आहे. ग्राहकानं वाढदिवसानिमित्त केकची ऑर्डर दिली होती. हा केक डिलेव्हरी बॉय देण्यासाठी आला असता त्याची दुचाकी ग्राहकानं पळवली. या प्रकरणी समतानगर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून, त्याच शोध घेत आहेत.
कांदिवली पूर्व परिसरात असलेल्या हनुमाननगर इथं केक शॉप आहे. त्या ठिकाणी एक व्यक्ती त्याच्या भाचीचा वाढदिवस असून, त्यासाठी केक बुक करायचा आहे, असे सांगत आली. तसेच आकुर्ली रोड परिसरात असलेल्या इमारतीत तो पाठवून देण्यासही त्यानं सांगितलं. त्यावेळी ही ऑर्डर ओमकार मोहिते (२३) या शॉपमधील कर्मचाऱ्यानं बुक केली.
ऑर्डर बुकींगनंतर त्याच्या एका सहकाऱ्यासोबत तो केक पोहोचविण्यासाठी तिथं पोहोचला. त्यावेळी केक बुकिंगसाठी आलेला इसम त्यांना त्याच ठिकाणी सापडला. त्यानं मोहितेकडे मिठाई आणण्यासाठी त्याची मोटरसायकल मागितली. मात्र त्यावेळी मोहितेनं दुचाकी देण्यास नकार दिला. तेव्हा त्याच्या सहकाऱ्याला सोबत घेऊन जातो, असं त्या व्यक्तीनं सांगितलं.
सहकाऱ्याला नेतो असं सांगितल्यानं मोहितेनं त्याला दुचाकी देण्यासाठी तयारी दाखविली. त्यानुसार, ती व्यक्ती मोहितेच्या सहकाऱ्यासह मिठाईच्या दुकानात ऑर्डर देऊन आली. जवळच असलेल्या इस्त्रीच्या दुकानातून कपडे घेऊन येतो, असं त्याला सांगत, अखेर मोटरसायकल घेऊन पसार झाली.
ही बाब केक कर्मचाऱ्याच्या लक्षात आली आणि त्याने घडला प्रकार मोहितेला सांगितला. मोहितेने समतानगर पोलिसात धाव घेत, तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीस मोटरसायकल चोराचा शोध घेत आहेत.
हेही वाचा -
वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन, १३ लाख जणांवर कारवाई
क्लस्टर उद्घाटनाचे निमंत्रण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना नाही