बनावट सर्टिफिकेटप्रकरणी डाॅक्टर अटकेत

परदेशात वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेल्या सांगलीतील एका २९ वर्षीय डाॅक्टरला 'एमएमसी' महाराष्ट्र वैद्यकीय परिषदचे बनावट सर्टीफिकेट सादर केल्याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. धीरज पाटील (२९) असं या डाॅक्टरचं नाव आहे. या बनावट सर्टीफिकेट प्रकरणी २०१६ मध्ये धीरजवर आग्रीपाडा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रशियात शिक्षण

मूळचा सांगलीचा रहिवाशी असलेला धीरजने वैद्यकीय शिक्षण २०१२ मध्ये रशियात पूर्ण केले आहे. मात्र भारतात काम करण्यासाठी वैद्यकीय परिषदेची(एमसीआय) विशेष परिक्षा (एनबीई) पास करणे बंधनकारक असते.  मात्र पाटीलने एमएमसीकडे २०१२ ते २०१६ या वर्षात काळात एनसीआय सर्टीफिकेट, एनबीई गुणपत्रिका व इतर गोष्टी सादर केल्या. पण पाटीलने सादर केलेली एनबीई परीक्षेची निकाल पत्रिका आणखी एका विद्यार्थ्यानेही सादर केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. चौकशीत पाटील हा दिल्लीत एनबीई परीक्षा नापास झाल्याचे पुढे आले.  त्यावेळी पाटीलने सादर केलेले सर्टीफिकेट बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एमएमसीने याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांकडे धीरज विरोधात तक्रार नोंदवलेली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांना शरण

 या प्रकरणी अटक टाळण्यासाठी धीरजने सांगलीतील स्थानिक न्यायालय व उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर त्याला आग्रीपाडा पोलिसांपुढे हजर होण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार धीरज मंगळवारी आग्रीपाडा पोलिसांना शरण आला. या प्रकरणी धीरजला अटक करण्यात आली आहे. त्याने हे बनावट सर्टिफिकेट कुठून आणले याचा पोलिस आता शोध घेत आहेत.


हेही वाचा -

आयपीएल मॅचदरम्यान सट्टा खेळणाऱ्या ५ जणांना अटक

शादी डाॅट काॅमवरील ओळख तरूणीला पडली महागात


पुढील बातमी
इतर बातम्या