एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण (Antelia explosive case) आणि मनसुख हिरण हत्याप्रकरणात एनआयएनं गुरुवारी पहाटे शर्मा यांच्या घरावर धाड टाकून त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांची एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना एनआयएकडून अटक करण्यात आली.

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणात सहभाग आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोपांखाली प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणांमध्ये याआधीही दोन वेळा एनआयएकडून प्रदीप शर्मांची चौकशी करण्यात आली होती. आता त्यांच्याविरोधात नव्याने पुरावे मिळाल्याने त्यांना अटक केल्याचं बोललं जात आहे. 

एनआयए प्रदीप शर्मांना कोर्टात हजर करुन कोठडीची मागणी करणार आहे. प्रदीप शर्मा यांच्याशी संबंधित बिल्डर संतोष शेलार आणि आशिष जाधव यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रदीप शर्माही एनआयएच्या रडारवर होते. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रदीप शर्मांच्या घरी छापेमारी करत एनआयएने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी आतापर्यंत सचिन वाझे,विनायक शिंदे, रियाझ काझी, सुनील माने, नरेश गोर, संतोष शेलार, आनंद जाधव यांना अटक करण्यात आली आहे. 

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटीनने भरलेली स्कॉर्पियो कार २५ फेब्रुवारी रोजी सापडली होती. त्यानंतर ४ मार्च रोजी कारचा मालक मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सचिन वाझे यांना अटक केली होती. या दोन्ही प्रकरणात वाझे यांच्या संपर्कात प्रदीप शर्मा होते, असं बोललं जात आहे. 



हेही वाचा - 

कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची होणार सखोल चौकशी

माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा NIAच्या ताब्यात, चौकशी सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या