Advertisement

कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची होणार सखोल चौकशी

पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये एका गृहसंकुलात झालेल्या संशयास्पद कोविड-१९ लसीकरण प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची होणार सखोल चौकशी
SHARES

पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये एका गृहसंकुलात झालेल्या संशयास्पद कोविड-१९ लसीकरण प्रकाराची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. सोबतच ४८ तासांमध्ये त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी दिले आहेत.

दरम्यान, गृहनिर्माण संस्थांनी खासगी लसीकरण केंद्रांशी सामंजस्य करार करावा. त्यांच्या नोंदणीसह सर्व बाबींची खातरजमा करुन नंतरच लसीकरण उपक्रम राबवावा, असं आवाहनही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये एका गृह संकुलात सुमारे ३९० रहिवाशांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात आली. मात्र, लसीकरण करणाऱ्या संबंधित चमूकडे लॅपटॉप आदी साधनं नव्हती.

तसंच लस घेतलेल्या लाभार्थ्यांना विविध रुग्णालयांच्या नावानं लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त झालं. हा सर्व प्रकार संशयास्पद निर्माण करणारा असल्यानं रहिवाशांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, असं संशयास्पद लसीकरण होणं, ही बाब गंभीर आणि आरोग्यास धोकादायक आहे. नागरिकांनी आपल्या गृहनिर्माण संस्थेमध्ये लसीकरण करण्यापूर्वी खासगी रुग्णालय लसीकरण केंद्रांशी सामंजस्य करार करणं आवश्यक आहे.

तशा मार्गदर्शक सूचना महानगरपालिका प्रशासनानं यापूर्वीच सांगितल्या आहेत. त्यानुसार आवश्यक बाबींची खातरजमा करून खबरदारी घेणं आवश्यक आहे. 

'हे' लक्षात ठेवा

  • प्रत्येक खासगी लसीकरण केंद्रास कोविन प्रणालीतर्फे एक नोंदणी क्रमांक देण्यात येतो. हे लक्षात घेता, खासगी लसीकरण केंद्राच्या नोंदणी संदर्भात नागरिकांनी आणि गृहनिर्माण संस्थांनी आपल्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून खातरजमा करावी.
  • खासगी लसीकरण केंद्रातर्फे होणाऱ्या लसीकरणासाठी संबंधित संस्थेसोबत सामंजस्य करार (MoU) करण्यासह, त्या केंद्रातर्फे लसीकरणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र पडताळावे. त्या संदर्भात योग्य शहानिशा करावी.
  • लसीकरण झाल्यानंतर लाभार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र त्वरित मिळण्याचा आग्रह करावा, असंही प्रशासनाकडून पुन्हा एकदा सूचित करण्यात येत आहे.
  • या संदर्भात कोणत्याही संशयास्पद बाबी आढळून आल्यास आपल्या विभागातील संबंधीत वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असं नम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 


नेमकं प्रकरण काय?

कांदिवली (kandiwali) तील हिरानंदानी इस्टेट सोसायटीत ३० मे रोजी लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी ३९० नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. या शिबिराची सुविधा राजेश पांडे या व्यक्तीने उपलब्ध केली होती. आपण कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचं त्याने सोसायटीतील नागरिकांनी सांगितलं होते.

राजेश पांडे याने सोसायटी समितीच्या सदस्यांशी संपर्क केला होता. तर संजय गुप्ता याने शिबीर घेतलं आणि महेंद्र सिंग यांने सोसायटीतील सोसायटी सदस्यांकडून रोख पैसे घेतले, अशी माहिती नागरिकांनी दिली आहे.

मात्र, लस घेतल्यानंतर कुणालाही मेसेज आला नाही. तसंच लस घेतल्यानंतर कोणतीही लक्षणं दिसली नाही किंवा दुष्परिणामही दिसून आले नाहीत, असं नागरिकांनी सांगितलं.

ज्या रुग्णालयांच्या नावाने प्रमाणपत्र दिले गेले, त्या रुग्णालयांनी आपण लसीकरण शिबीर घेतलं नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे आपल्याला बोगस लस दिली गेल्याचं या नागरिकांनी समजलं. सोसायटीतील नागरिकांनी प्रति डोस १२६० रुपये दिले आहेत. 



हेही वाचा

कोरोनावरील लसीकरणानंतर पहिल्या मृत्यूची अधिकृत नोंद

दिव्यांगांसाठी १७ जूनला नवी मुंबईतील ३ रुग्णालयांत लसीकऱण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा