कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर एका ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनावरील लशींच्या दुष्परिणामांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या राष्ट्रीय समितीने या पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे.
या समितीनं ३१ जणांची तपासणी करून कोरोना लस घेतल्यानंतरच्या गंभीर दुष्परिणामांचा अभ्यास केला आहे. समितीनं कोरोनोची लस घेणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू अॅनाफिलेक्सिस नावाच्या रिअॅक्शनमुळं झाल्याचं मान्य केलं आहे.
या समितीच्या अहवालानुसार, ६८ वर्षांच्या या व्यक्तीला ८ मार्च २०२१ रोजी लस देण्यात आली होती. त्यानंतर अॅनाफिलॅक्सिसमुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला. अॅनाफिलेक्सिस ही एक गंभीर अॅलर्जिक रिअॅक्शन आहे. लस घेतल्यानंतर या रिअॅक्शनची काही प्रकरणं समोर आली आहेत.
समितीचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितलं की, कोरोना लसीकरणानंतर अॅनाफिलॅक्सिसमुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. लसीकरणानंतर केंद्रावर किमान ३० मिनिटे थांबणे का आवश्यक आहे हे या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. बहुतेक अॅनाफिलॅक्टिक दुष्परिणाम लसीकरणानंतर ३० मिनिटांपर्यंत दिसून येतात. या कालावधीत तातडीने उपचार करण्यात आले तर संबंधित व्यक्तीचा मृत्यू टाळता येऊ शकतो.
अहवालानुसार, एप्रिलमधील आकडेवारीचा विचार करता, लशीचा डोस घेणाऱ्या १० लाख लोकांमागे २.७ लोकांचा मृत्यू होत आहे, तर रोज दहा लाख लोकांपैकी ४.८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.
केवळ मृत्यू होणे किंवा एखाद्याला रुग्णालयात दाखल करावे लागणे यामुळे या घटना लसीकरणामुळेच उद्भवल्या हे सिद्ध होत नाही. समितीने अभ्यास केलेल्या ३१ पैकी १८ मृत्यू प्रकरणांचा लसीकरणाशी काहीही संबंध नसल्याचे आढळले. सात प्रकरणे अनिश्चित श्रेणीतील, तीन प्रकरणे लस उत्पादनाशी संबंधित, एक प्रकरण चिंता आणि बेचैनीशी संबंधित होते. दोन प्रकरणे कोणत्याही श्रेणीतील नसल्याचे समितीने म्हटले आहे.
हेही वाचा -