गुन्हेगारांचा कर्दनकाळ राजकारणात कोणाचा एन्काउंटर करणार?

एन्काउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असणारे आणि ११३ गुंडांचा खात्मा करणारे चकमकफेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. प्रदीप शर्मा यांचा राजीनामा पोलीस महासंचालक कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हा राजीनामा मंजुर झाल्यानंतर प्रदीप शर्मा आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणं, शर्मा हे विधानसभा निवडणुकीत शिवसेना किंवा भाजप युतीचे उमेदवार असतील अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

व्यक्तिगत कारणांमुळं राजीनामा

१९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झालेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै रोजी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्याचा अर्ज दिला. व्यक्तिगत कारणांमुळं राजीनामा देत असल्याचं कारण शर्मा यांनी दिलं आहे. तसंच, नियमाप्रमाणं त्यांनी हा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला गेलेला नाही. प्रदीप शर्मा ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. २००८ मध्ये प्रदीप शर्मा पोलीस दलातून निलंबित झाले होते. त्यानंतर, २०१७मध्ये शर्मा पोलीस सेवेत पुन्हा रुजू झाले. प्रदीप शर्मा यांची कारकीर्द वादात राहिली असून, नव्वदच्या दशकात त्यांनी अनेक गुन्हेगारांना संपवलं होतं.

२००८ मध्ये निलंबित

प्रदीप शर्मा यांनी रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचं बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध या आरोपांमुळे २००८ मध्ये शर्मा यांना निलंबित करण्यात आलं होतं. लखनभय्या एन्काऊंटर प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्यासह १३ जणांना अटकही करण्यात आली होती. परंतु, २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं शर्मा यांची आरोपातून मुक्तता केली. तसंच, तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपांमधून देखईल त्यांची मुक्तता करण्यात आली होती. सर्व आरोपांतून निर्दोश मुक्तता झाल्यावर पुन्हा एकदा पोलीस दलात रुजू होण्यासाठी प्रदीप शर्मा यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडं दाद मागितली होती. त्यानंतर काही महिने प्रदीप शर्मा यांना दुर्लक्षित करण्यात आलं. परंतु, काही कालावधीनंतर गृहखात्याने त्यांना पोलीस सेवेत रुजू करून घेतलं.

अट्टल गुन्हेगारांचा एन्काऊंटर

परवेझ सिद्दीकी, रफिक डबावाला, सादिक कालिया या अट्टल गुन्हेगारांचा त्यांनी एन्काऊंटर केला आहे. मुंबईवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या 'लष्कर ए तोयबा'च्या ३ दहशतवाद्यांचा देखील त्यांनी एन्काऊंटर केला होता. एकूण २५ वर्षांच्या सेवेत शर्मा यांनी १०० पेक्षा जास्त एन्काऊंटर केले आहेत. मात्र हे एन्काउंटर स्पेशलिस्ट आता राजकारणात म्हणजेच शिवसेना किंवा भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा -

दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेची योजना

जागा वाटपावरून युतीत पुन्हा कलगीतुरा?


पुढील बातमी
इतर बातम्या