पगार न वाढवल्याने बाॅसचा 'असा' घेतला बदला!

पगार न वाढल्यामुळे नाराज झालेले नोकरदार कधी कमात चालढकलपणा करून, तर कधी काम न करता मालकांना त्रास देत असतात. मात्र घाटकोपरमधील एका ३० वर्षीय इंजिनीअरने पगार न वाढवल्याच्या रागातून मालकाला त्रास देताना कहरच केला. या महाभागाने मालकाच्या नावाचा बनावट ई-मेल आयडी बनवून महिलांशी अश्लील संभाषण करत त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण उघडकीस आल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून राकेश देसाई (३०) असं त्याचं नाव आहे.

काय आहे प्रकरण?

घाटकोपर परिसरातील 'स्काय लाईन' कंपनीत आरोपी राकेश देसाई ३ ते ४ वर्षांपासून कार्यरत होता. जोगेश्वरी परिसरात राहणारा राकेश साॅफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कंपनीत कामाला होता. पण मागील २ वर्षांपासून मालकाने पगारवाढ न केल्यामुळे तो काहीसा नाराज होता.

पगारवाढीवर मालकाचा संताप

या वर्षी तरी पगारवाढ मिळेल, या आशेने तो कंपनीसाठी प्रचंड मेहनत देखील घेत होता. तरीही मात्र मालकाकडे पगार वाढीचा विषक काढताच तो खवळायचा. अखेर मालकाच्या या स्वभावाला कंटाळून राकेशने मालकाला चांगलाच धडा शिकवण्याचं ठरवलं.

ई-मेल केलं हॅक

राकेशला मालकाचे ई-मेल आयडी आणि फोन नंबर माहिती असल्याने त्याने वेगवेगळे साॅफ्टवेअर वापरून मालकाचे ई-मेल हॅक केले. त्यानंतर याच ई-मेलवरून राकेश कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना आणि मालकांच्या संपर्कात असलेल्या महिलांना अश्लील मेसेज पाठवू लागला.

असभ्य वर्तनाची चर्चा

सुरूवातीला मालकाच्या या असभ्य वर्तनाची चर्चा संपूर्ण कार्यालयात होऊ लागली. मात्र हा प्रकार वाढतच गेल्याने अनेक महिलांनी मालकाला घेरून जाब विचारला. त्यावेळी आपण हे कृत्य केलं नसल्याचं सांगितलं आणि घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

पोलिस तपासात राकेशचा सहभाग निश्चित झाल्यानंतर नुकतीच घाटकोपर पोलिसांनी राकेशला अटक केली. मालकाने पगारवाढ न केल्याच्या रागातून मालकाला अडचणीत आणण्यासाठी आपण हे कृत्य केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी दिली.


हेही वाचा-

सलमानविरोधातलं 'हे' वाॅरंटसुद्ध रद्द!

अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश


 

पुढील बातमी
इतर बातम्या