अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश


अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश
SHARES

मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथकाने ठाण्यात चालणाऱ्या अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका २८ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १३९ सिमकार्ड, एक लॅपटॉप, ५ सिमबॉक्स मशीन आणि ३ राऊटर हस्तगत केले आहेत. न्यायालयाने या आरोपीला २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजवर कारवाई

अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजचा मुंब्रा अड्डा बनत चालला आहे. या परिसरात गेल्या ५ महिन्यांत दुसऱ्यांदा दहशतवाद विरोधी पथकाने ठाण्याच्या मुंब्रा परिसरात छापे टाकत अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजवर कारवाई केली. अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजमध्ये सिमबॉक्स इंटरनेट कनेक्शनला राऊटरच्या माध्यमातून जोडले जातात आणि परदेशातून येणारे आंतरराष्ट्रीय व्हीओआयपी कॉल राऊट करून भारतातील मोबाइल नंबर किंवा लँडलाइनशी जोडले जातात. एकप्रकारे आंतरराष्ट्रीय कॉलचे डोमॅस्टिक कॉलमध्ये रुपांतर केले जातात. कोणतीही सुरक्षा यंत्रणा आंतरराष्ट्रीय कॉलचा मार्ग काढू शकणार नाही. शिवाय डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (डीओटी) यांच्याकडे कॉलची नोंदही होणार नाही.


हवाला रॅकेटची शक्यता

अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजद्वारे हवाला रॅकेटही चालत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच, एक्स्चेंजद्वारे होणाऱ्या कॉलचा वापर देशविघातक आणि इतर अवैध कामासाठी होण्याची भीती आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ही बाब अतिशय गंभीर आहे.

याप्रकरणी काळाचौकी दहशतवादी पथकाने गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यातील मूळ आरोपी त्याच्या भावाच्या मदतीने अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज चालवत होता. हे दोघेही मूळचे उत्तरप्रदेशच्या आझमगढचे रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी या दोघांकडून तब्बल २ लाख ४८ हजार रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा