चिमुरड्याच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर गुन्हा

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • क्राइम

गुरूवारी चेंबूर येथील चित्ता कॅम्प येथील नाल्यात बुडून एहसान परवेझ तांबोळी या ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मुंबई महापालिकाच एहसानच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं म्हणत एहसानच्या कुटुंबियांसह स्थानिकांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार अखेर ३ दिवसांनंतर सोमवारी याप्रकरणी ट्राॅम्बे पोलिसांनी कारवाई केली. कंत्राटदार विधी एंटरप्रायझेससह संबंधित अधिकाऱ्यांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती ट्राॅम्बे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनील गावकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

चप्पल नाल्यात अडकली

गुरूवारी सकाळी मुंबईत पावसानं चांगलाच जोर पकडला होता नि याच पावसाचा आनंद घेण्यासाठी, पावसात मनमुराद भिजण्यासाठी एहसान घराबाहेर गेला. भिजताना त्याची चप्पल जवळच्या नाल्यात अडकली आणि ती चप्पल काढण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय घसरला. पावसामुळं हा नाला ओव्हरफ्लो झाल्यानं पाय घसरल्याबरोबर नाल्यातील पाण्याच्या प्रवाहानं एहसानला ओढून घेतलं. एहसान नाल्यात पडल्याचं पाहिल्याबरोबर स्थानिकांनी अग्निशमन दलाला बोलावलं. त्यानंतर अग्निशमन दलानं एहसानला नाल्यातून बाहेर काढत जवळच्या शताब्दी रूग्णालयात नेलं. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. एहसानला डाॅक्टरांनी मृत घोषित केलं.

पालिकाच जबाबदार

एहसानच्या मृत्यूमुळं पालिकेच्या नालेसफाईचा पर्दाफाश झाला असून नाले उघडे ठेवत पालिका कसं मृत्यूला आमंत्रण देत आहे ही बाबही यानिमित्तानं समोर आली. एहसानच्या मृत्यूनंतर चित्ता कॅम्प परिसरात एकच खळबळ उडाली. एहसानच्या कुटुंबियांनी यासाठी पालिकेलाच जबाबदार ठरवलं. एहसानची काकी हसीना यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना आपली व्यथा मांडली. 

झाकणं वाहून जातात

नाल्यांची साफसफाई कधीच होत नाही, नाल्याला फायबरची झाकणं लावतात, ती पाण्याच्या प्रवाहानं वाहून जातात. झाकणं वाहून गेल्यानंतर पालिका अधिकारी ती तशीच उघडी ठेवतात. अशा उघड्या नाल्यात पडून काही दुर्घटना घडेल यासंबंधीची तक्रार आम्ही नेहमीच स्थानिक नगरसेवकाकडे करत होते. पण आमच्याकडे कुणीच लक्ष दिलं नाही अाणि अखेर ही दुर्घटना घडलीच, असे त्या म्हणाल्या.

 कुटुंबीयांचं सांत्वन

सोमवारी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी घटनास्थळाला भेट देत एहसान कुटुंबियांचं सांत्वन केलं. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत नाल्यांची सफाई करत झाकणं बसवण्याचे आदेश दिल्याची माहिती यावेळी शेवाळे यांनी दिली. तर याप्रकरणी चौकशी करत संबंधितांविरोधात कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. त्यानुसार काही वेळातच ट्राॅम्बे पोलिसांनी कंत्राटदारासह संबंधित पालिका अधिकाऱ्यांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला.


हेही वाचा - 

मंत्रालयासमोर पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई पोलिस आयुक्तपदाची माळ संजय बर्वे यांच्या गळ्यात?


 

पुढील बातमी
इतर बातम्या