सावधान! नोकरी डाॅट काॅमवरून अर्ज करताय? तर हे वाचा...

कांदिवली परिसरातील महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीत कामाला लावण्याचं प्रलोभन दाखवून पालघरमधील २३ वर्षीय तरुणीची १ लाख १० हजार रुपयांना सायबर चोरट्यांनी फसवणूक केली आहे. या प्रकर‌णी बोरिवली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

८५३३०८८७७० नंबरवरून फोन 

पालघरच्या केलठन परिसरात राहणारी करिष्मा पाटील या तरुणीचं एमबीए शिक्षण पूर्ण झाले आहे. ती सध्या बोरिवलीच्या रोबोकार्ट प्रा. लिमीटेड कपंनीमध्ये सहा महिन्यांपासून काम करत आहे. उच्च शिक्षण घेतल्यामुळे ती चांगल्या कंपनीतील नोकरीच्या शोधात होती. त्यासाठी इंटरनेटवरील संकेतस्थळावर तिने बायोडेटा अपलोड केला होता. त्यानंतर १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ४.३० वाजताच्या सुमारास करिष्माला ८५३३०८८७७० या मोबाइल नंबरवरून फोन आला. त्यावेळी समोरील महिलेने मी महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीमधून पुजा अग्रवाल बोलत असून तुमचा बायोडाटा पाहून महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीमध्ये तुम्हाला जाॅब मिळणार असल्याचं सांगितलं. या जाॅबसाठी naukariways.com साईडवर जावून अ‍ॅप्लीकेशन करा. त्यासाठी तुम्हाला ३० रूपये फी आॅनलाईन भरावी लागेल असंही सांगितलं. मात्र करिष्माने त्याकडे दुर्लक्ष केले.

३ हजार रूपये डेबिट 

 त्यानंतर १३ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास करिष्माला पुन्हा  ८५३३०८८७७० या मोबाइल नंबरवरून फोन आला. यावेळीही पुजा अग्रवाल हिने महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीत नोकरी हवी असल्यास naukariways.com या साईटवर अ‍ॅप्लीकेशन करण्यास सांगितलं. याप्रमाणे करिष्माने बायोडेटा अपलोड करत अ‍ॅप्लीकेशन फाॅर्म भरला. तसंच प्रोसेसिंग फी चे ३० रुपये तिने तिच्या सिंडीकेट बँकेच्या डेबिट कार्डवरून भरले. करिष्माला एक ओटीपी आला. मात्र तो ओटीपी मॅच न झाल्यामुळे तिने पुन्हा रिओटीपीसाठी अप्लाय केला असता तिच्या मोबाइलवर ३ हजार रूपये डेबिट झाल्याचा मेसेज आला. 

पुन्हा १ लाख डेबिट

करिष्माने पुजा अग्रवालला फोन करून  खात्यामधून ३ हजार रूपये डेबिट झालेले असून ते पैसे MOBIKW ७०००८८६९ या अकाउंटवर गेल्याचे सांगितले असता पुजाने पैसे डेबिट झाल्याचा संदेश मला पाठवा तुमचे पैसे रिफंड होतील असे सांगितले. त्यानुसार तो मेसेज करिष्माने पुजाला पाठविला. त्यानंतर लगेच करिष्माच्या मोबाइलवर डेबिट कार्डवरून पुन्हा १ लाख  ७ हजार ९८९ रुपये हे पेटीएम अकाउंट नं. ७००१११११ वर गेल्याचे मेसेज आला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर करिष्माने खाते ब्लाॅक करून बोरिवली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


हेही वाचा -

रेल्वेत सोनसाखळी चोरांचा धुमाकुळ; ६ वर्षात ८ कोटींच्या सोनसाखळी चोरीस

वडाळा टीटी येथील हत्येचा पाच दिवसानंतर उलगडा


पुढील बातमी
इतर बातम्या