'त्याने' चक्क घरातच उगवला गांजा, पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबईतल्या माहुल परिसरातील एका घरात चक्क गांजाची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम’च्या साहाय्याने गांजाची लागवड करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेनं गांजाची विक्री करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. परंतु, या गांजाची विक्री करणारा मूळ आरोपी फरार असल्याची माहिती समोर येत आहे.

अभियांत्रिकीचं शिक्षण

निखिल शर्मा (२६) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. अभियांत्रिकीचं शिक्षण अर्धवट सोडून तो या मार्गाकडं वळल्याचं समजतं. माहुल परिसरात निखिल हा खांद्याला बॅग अडकवून संशयतरीत्या फिरताना पोलिसांना दिसल्यानं गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांच्या पथकानं त्याला अडवलं. त्यावेळी त्यानं तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ताब्यात घेत त्याची झडती घेतली.

१ किलो गांजा

झडतीत त्याच्याजवळ १ किलो गांजा आणि ५४ ग्रॅम एमडी सापडलं. या आमलीपदार्थाची किंमत सुमारे ३ लाख रुपये इतकी आहे. निखिल यानं हा गांजा मित्राच्या घरातच ‘हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम’च्या साहाय्यानं उत्पादित केल्याची माहिती पोलिसांना दिली. याबाबत माहिती मिळताच पथकानं तात्काळ माहुल परिसरातील पालव बाग परिसरातील घरावर छापा घातला. या छाप्यात ‘हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम’चे ३ तंबू, कुंड्या, एलईडी दिवे, टायमर यंत्रणा, पीएच सॉइल टेस्टर, आद्र्रता मापक, हायड्रोपोनिक न्युट्रियंट्स, गांजाच्या वेगवेगळ्या प्रजातीच्या बिया असं ६ लाख रुपयांचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे.

फरार आरोपीचा तपास

निखिलच्या फरार मित्रानं एका संकेतस्थळाच्या माध्यमातून गांजा उत्पादनासाठी आवश्यक साहित्य, केमिकल्स, अमलीपदार्थ मागविलं होतं. याप्रकरणी पोलीस फरार आरोपीचा तपास घेत असून, त्याच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.


हेही वाचा -

फास्टॅगचे स्टिकर अपुरे, रोखीनं टोल भरण्याच्या मुदतीत १ महिन्याने वाढ

PMC खातेदारांची मातोश्री बंगल्यासमोर निदर्शने


पुढील बातमी
इतर बातम्या