इन्स्टाग्रामची मैत्री नडली, अल्पवयीन मुलीवर तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार

इन्स्टाग्रामवरून (instagram friends) झालेली मैत्री एका अल्पवयीन मुलीला (minor girl) चांगलीच महागात पडली आहे. या १६ वर्षीय मुलीवर तीन ठिकाणी सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. 

मालवणी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीची इन्स्टाग्रामवरून काही मुलांसोबत ओळख झाली होती. त्यापैकी एका मित्रानं वाढदिवसाची पार्टी ठेवली होती. वाढदिवस साजरा करण्यासाठी ३१ मेच्या रात्री सहा जणांनी तिला मालाडमधील मढ या ठिकाणी एका हॉटेलजवळ बोलावले. या ठिकाणी त्यांनी पार्टी केली. त्यानंतर कारमध्येही एक केक कापण्यात आला. यावेळी दोन मित्रांनी तिला कारमध्ये नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर मुलीला मालाडमधील एका दुसऱ्या मित्राच्या घरी सोडण्यात आलं. येथेही तिच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलगी घरी न जाता आपल्या एका मित्राच्या घरी गेली. तिथे देखील मित्रानं तिच्यावर बलात्कार केला. ही घटना ३१ मे आणि १ जूनच्या रात्री घडली.

मुलीच्या कुटुंबीयांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मालाड पोलीस स्थानकात नोंदवली.  पोलिसांनी तात्काळ तिचा शोध सुरु केला होता. दरम्यान, दुसर्‍या दिवशी दुपारी मुलगी स्वतःच घरी परतली. जेव्हा ती घरी परतली तेव्हा ती खूपच घाबरलेली होती. जेव्हा तिच्या पालकांनी तिला विचारले ती कुठे होती आणि नेमकं काय करत होती. तेव्हा तिने काहीही सांगितलं नाही.

 यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांची एक टीम मुलीच्या घरी पोहोचली. सुरुवातीला मुलगी त्यांनाही काहीच सांगत नव्हती. मात्र, नंतर तिने  पोलिसांना सर्व सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपी १८ ते २३ या वयोगटातील आहेत. सर्व आरोपींना पॉक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.



हेही वाचा - 

लोकलमध्ये विनामास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी घट

बेस्ट १०० टक्के प्रवासी क्षमतेनं धावणार

पुढील बातमी
इतर बातम्या