कमला मिल आग: बघा 'असा' आला युग तुली पोलिसांच्या ताब्यात!

मागच्या १५ दिवसांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस बिस्ट्रो पबचा मालक युग तुली याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सोमवारी रात्री पोलिसांनी युगला ताब्यात घेतल्याचं म्हटलं जात आहे. अग्निशमन दलाने आगीचा चौकशी अहवाल दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी मोजोसच्या मालकांवर लक्ष केंद्रीत केल्यानंतर युग फरार झाला होता. युगला आज दुपारी भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात येईल.

कमला मिल कंपाऊडमधील वन अबोव्ह आणि मोजोस बिस्ट्रो पबला २९ डिसेंबर लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता, तर ३० जण गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पबच्या मालकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे नोंदवले.

'असा' आहे घटनाक्रम

वन अबोव्हमध्ये मनुष्यहानी झाल्याने ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी सर्वप्रथम वन अबोव्ह पबचे मालक क्रिपेश, जिगर संघवी आणि अभिजीत मानकरवर यांच्यावर गुन्हा नोंदवला. तर मोजोसचे मालक युग पाठक आणि युग तुलीला चौकशीसाठी बोलावलं. चौकशीसाठी बोलवूनही दोघे पोलिसांसमोर येत नसल्याने पोलिसांनी दोघांविरोधात सुओमोटो नोटीस काढली. त्यानंतर युग तुली आणि युग पाठक या दोघांनी पोलिसांसमोर येऊन आपापले जबाब नोंदवले. यादरम्यान पोलिस प्रामुख्याने वन अबोव्हच्या मालकांच्या मागावर होती.

अखेर पोलिसांच्या ताब्यात

परंतु अग्निशमन दलाने सादर केलेल्या अहवालानंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. आग सर्वात पहिल्यांदा मोजोस बिस्ट्रो पबला लागल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी युग पाठक आणि युग तुलीला अटक करण्यासाठी विशेष पथकं पाठवली. ७ जानेवारीला पोलिसांनी युग पाठकला अटक केली. मात्र अटक टाळण्यासाठी युग तुली पोलिसांपासून पळ काढत होता. अखेर युगला अटक करण्यात ना. म. जोशी मार्ग पोलिसांना यश आलं. युगला कुठून अटक केली? याबाबत पोलिस कमालीची गुप्तता बाळगत आहेत. तर दुसऱ्या बाजूला युग स्वत: हून पोलिसांना शरण आल्याचीही चर्चा आहे.

युग तुलीने सकाळी वकिलांसोबत पोलिस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी त्याला अटक केली असून मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याला भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

- अहमद पठाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाणे

कारियाची जामिनावर सुटका

वन अबोव्हचे मालक अभिजीत मानकर, क्रिपेश संघवी व जिगर संघवी यांना आश्रय दिल्याबद्दल पोलिसांनी अटक केलेल्या विशाल कारियाची भोईवाडा दंडाधिकाऱ्यांनी जामिनावर सुटका केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी त्याला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्याविरुद्ध कारियाने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार उच्च न्यायालयाने त्याची १० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.


हेही वाचा-

कमला मिल आग: उच्च न्यायालयानं महापालिकेला फटकारलं

कमला मिल आग: वन अबोव्हच्या तिन्ही मालकांना पोलिस कोठडी

कमला मिलमधील 'ती' आग हुक्क्यामुळेच!


पुढील बातमी
इतर बातम्या