महिला कैद्याचा मृत्यू : 6 जणांवर हत्येचा गुन्हा

भायखळा कारागृहात एका महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. संतापलेल्या इतर महिला कैद्यांनी हा नैसर्गिक मृत्यू नसून, हत्या असल्याचा आरोप करत कारागृहात आंदोलन करीत, जेल प्रशासनाला धारेवर धरले. एवढेच नव्हे, तर काही कैद्यांनी छतावर चढून आग लावण्याचाही प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत महिला कैद्यांना शांत केल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी जेलच्या 6 पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात भादंवि कलम 302 आणि 34 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये जेल अधिकारी मनिषा आणि पाच गार्ड यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.

हत्येच्या प्रकरणात भोगत होती शिक्षा

मंजू शेटे उर्फ दिपा असे या मृत महिला कैद्याचे नाव असून, तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मंजू उर्फ दिपाला हत्येच्या प्रकरणात शिक्षा झाली आहे. यापूर्वी ती पुणे येथील येरवडा कारागृहात होती. त्यानंतर तिला मुंबईतील भायखळ्यातील महिला कारागृहात हलविण्यात आले होते.


जेल अधिकाऱ्यासोबत झाला हाेता वाद

मंजूचा शुक्रवारी संध्याकाळी जेल अधिकाऱ्याशी वाद झाल्याने तिला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. मारहाणीमुळे अचानक रात्री छातीत कळा येऊ लागल्याने, तिला जे. जे रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.


मारहाणीत मृत्यू झालाचा कैद्यांचा आरोप

मंजूचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु मंजूचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नव्हे, तर मारहाणीत झाल्याचा आरोप करत महिला कैद्यांनी कारागृहात आंदोलन केले.


आंदोलन चिघळल्याने छतावर जाऊन आग लावण्याचा प्रयत्न

एवढ्यावरच न थांबता काही महिला कैद्यांनी कारागृहाच्या छतावर जाऊन आग लावण्याचाही प्रयत्न केला. या प्रकाराची माहिती नागपाडा पाेलिसांना समजताच त्यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेत महिला कैद्यांची समजूत घालत त्यांना छतावरून खाली उतरवले.


मंजूचा मृत्यू कसा झाला, याबाबत आम्हाला कुणीच काहीही सांगत नाही. आमच्यापासून काही तरी लपवले जात आहे. या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी केली पाहिजे. रिपोर्ट शिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही.
- अनंत शेटे, मंजूचा भाऊ

दरम्यान मंजूच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सहा अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांना अटक करावी अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी केली आहे. निलम गोऱ्हे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली आहे. 

काय मागणी केलीय निलम गोऱ्हे यांनी -

  •  राज्यातील सर्व कारागृहांमध्ये महिला कैद्यांसाठी एक आश्वासक वातावरण तयार होण्यासाठी राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा
  • या प्रकरणाचा तातडीने निकाल लागावा, यासाठी ही केस न्यायालयात दाखल करण्यात येऊन त्याची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी
  • असे प्रकार टाळावेत यासाठी कारागृहात सीसीटीव्ही बसवावेत
  • या घटनेचा तपास निष्पक्षपातीपणे तपास होण्याच्या दृष्टीने भायखळा कारागृहात तात्पुरता तपास कक्ष उभारण्याबाबत पोलिसांना परवानगी द्यावी
  • महिला हक्क समितीचे पुर्नगठण करण्याबाबत कार्यवाही करण्याविषयी कार्यवाही करण्याबाबत संबधितांना सूचित करण्यात यावे. 



हे देखील वाचा - 

उल्हासनगरमध्ये बंदुकीचा थरार! धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले...

डॉक्टरने घेतला मैत्रिणीच्या गालाचा चावा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या