‘थर्टी फस्ट’साठी बनावट दारू मुंबईत

मुंबईसह देशभरात सध्या ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असताना. त्या निमित्ताने आयोजित केलेल्या पार्ट्यांना मद्यपींसाठी लागणाऱ्या दारूची अवैधरित्या आयात केली जात आहे. नुकतीच राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाच्या कारवाईतून ही बाब पुढे आली आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या विभागाने लोणावळ्याजवळील कुसगाव टोलनाक्यावर मोठीकारवाई केली आहे. गोवा येथून महाराष्ट्रात येत असलेल्या कंटेनरची झडती घेत हा विदेशी दारूसाठा जप्त करत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हेही वाचाः- विले पार्ले इथल्या इमारतीत आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या दाखल

राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाला गोव्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आणला जाणार असल्याची माहिती मिळाली होती. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून हा मद्यसाठा आणला जाणार होता. यानुसार कुसगाव पथकर वसुली नाका येथे पोलिस संशयित कंटेनरची तपासणी करत होते. त्यावेळी एका १४ चाकी कंटेनरच्या चालक आणि क्लीनरजवळ चौकशी करण्यात आली. दोघांकडून ही अस्पष्ठ माहिती मिळाल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला.

हेही वाचाः- २६ डिसेंबारपासून सुरू होणार ‘मूड इंडिगो’

पोलिसांनी कंटेनरची तपासणी केली. त्यावेळी कंटेनरमध्ये गोवा बनावट विदेशी मद्याचे दोन हजार बॉक्स आढळले. पोलिसांनी हा मद्यसाठा आणि कंटेनर असा एकूण एक कोटी ४६ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.कंटेनर चालक आणि क्लीनर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच याप्रकरणी वाहन मालक, मद्यसाठा पुरवठादार, वाहतूकदार, मद्य खरेदीदार व गुन्ह्याशी संबंधित असलेल्या इतर इसमांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुढील बातमी
इतर बातम्या