विरार स्थानकात सापडले जिवंत काडतूस?

नेहमीच गर्दीने गजबजलेल्या विरार रेल्वे स्थानकात जिवंत काडतूस आढळून आल्याने सोमवारी संध्याकाळी एकच खळबळ उडाली. मात्र या संदर्भातील व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाल्याने या प्रकाराकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

नेमकं काय झालं?

पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार स्थानकातील प्लॅटफाॅर्म क्र. ६ वर हा प्रकार घडला. सोमवारी दुपारी ४.०३ वाजता विरारहून दादरला जाणाऱ्या लोकलमध्ये काही प्रवासी बसले होते. त्यापैकी एका प्रवाशाचं लक्ष रॅकवर ठेवलेल्या एका प्लास्टिकच्या पिशवीकडे गेलं. या पिशवीचा संशय आल्याने प्रवाशाने गाडीतून उतरुन त्वरीत विरार स्थानकातील 'आरपीएफ'ला या संयशास्पद पिशवीची माहिती दिली.

तपासणीत काय आढळलं?

रेल्वे पोलिसांनी त्वरीत डब्यात जाऊन ती पिशवी ताब्यात घेतली. त्यानंतर श्वान पथक आणि बॉम्ब शोध पथकाने ही पिशवी तपासली असता, पिशवीत बाॅम्ब नव्हे, तर चक्क ९ एम.एम. जिवंत काडतूस आढळून आलं.

तपास सुरू

यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता संबंधित पिशवीत पोलिसांना काडतूस नव्हे, तर लायटर सापडल्याचं सांगितलं. यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून प्रवाशांनी अफवांना बळी न पडण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.


हेही वाचा-

चालत्या ट्रेनमधून उतरणं अंगलट, ट्रेनसोबत गेला फरफटत

घाटकोपर मेट्रो स्थानकावर राडा, धक्काबुक्कीविरोधात प्रवाशाची तक्रार


पुढील बातमी
इतर बातम्या