घाटकोपर मेट्रो स्थानकावर राडा, धक्काबुक्कीविरोधात प्रवाशाची तक्रार

बुधवारी सकाळी घाटकोपर मेट्रो स्थानकावर चांगलाच राडा पाहायला मिळाला. प्रवाशांची रांग तोडणाऱ्या प्रवाशाला रोखण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकांनी प्रवाशाला रोखण्याएेवजी धक्काबुक्की केली.

SHARE

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावरील सर्वच मेट्रो स्थानकं सकाळी गर्दीच्या वेळेस प्रवाशांनी तुडुंब भरलेली असतात. मात्र तरीही प्रत्येक मेट्रो स्थानकावर मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) कडून शिस्त राखत गर्दी नियंत्रीत केली जाते. यात एमएमओपीएलच्या सुरक्षा रक्षकांचं मोठं योगदान असतं. असं असताना बुधवारी सकाळी मात्र घाटकोपर मेट्रो स्थानकावर चांगलाच राडा पाहायला मिळाला.प्रवाशाला धक्काबुक्की

प्रवाशांची रांग तोडणाऱ्या प्रवाशाला रोखण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकांनी प्रवाशाला रोखण्याएेवजी धक्काबुक्की केली आणि त्यावरून चांगलाच राडा झाला. दरम्यान ,याप्रकरणी प्रवासी दिपक दुबे यांनी एमएमओपीएलकडे तक्रार दाखल केली आहे. तर या तक्रारीची दखल पुढच्या ४८ तासांत घेत एमएमओपीएलनं धक्काबुकी करणाऱ्या एमएमओपीएलच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली नाही तर या प्रकरणी गुन्हा दाखल करू, अशी माहिती दुबे यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.


मॅनेजरने काॅलर पकडली

सकाळी दहाच्या सुमारास दुबे आॅफिसला जाण्यासाठी घाटकोपर मेट्रो स्थानकावर आले. त्यावेळी एका दिशेला प्रवाशांची मोठी रांग होती. त्यामुळे ही रांग मोडत दुसऱ्या दिशेला जाणं किंवा मग एक किमीचा वळसा घालणं हे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते. आॅफिसला पोहचायची घाई असल्यानं दुबे यांनी रांग मोडली. त्याबरोबर एमएमओपीएलच्या ५ ते ६ सुरक्षा रक्षकांनी धाव घेत दुबेंना रोखलं. यावेळी घाटकोपर मेट्रो स्थानकाच्या मॅनेजरने आपली काॅलर पकडत धक्काबुक्की केल्याचा दुबे यांचा आरोप आहे. आपण रांग मोडली हे खरं आहे, पण त्यासाठी एका दहशतवाद्याला पकडत असल्याप्रमाणं आपल्याला वागणूक दिल्याचं दुबे यांचं म्हणणं आहे.


कारवाई न झाल्यास गुन्हा 

एमएमओपीएलच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या या वागणुकीमुळं चिडलेल्या दुबे यांनी त्वरीत पोलिसांना १०० क्रमांकावर संपर्क साधला. पोलिसांना ट्विटही केलं. एमएमओपीएला ट्विट केलं. तसंच याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी दुबे यांनी चिराग नगर पोलिस ठाण्यात धावही घेतली. पण पोलिसांनी अंधेरी पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत मेट्रोच्या तक्रारी येत असल्यानं अंधेरीला जाण्यास सांगितलं. दुबेंनी मात्र थेट एमएमओपीएलकडे धाव घेतली आहे. त्यानुसार ४८ तासांत कारवाई न झाल्यास गुन्हा दाखल करण्याचा निर्णय दुबे यांनी घेतला आहे.


चौकशी सुरू 

याविषयी एमएमओपीएलच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता सुरक्षा रक्षक गेल्या चार वर्षांपासून आपल काम चोख करत आहेत. त्यांना त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं आहे. त्यामुळं त्यांच्याकडून अशी चुक होणार नाही, रांग मोडणाऱ्यांना रोखण हे त्यांच काम आहे. असं असलं तरी जी काही तक्रार आली आहे त्याची चौकशी सुरू असल्याचं प्रवक्त्यांनं सांगितलं आहे.हेही वाचा -

प्रवासी आरक्षण केंद्र 2 ऑगस्टला तात्पुरते बंद

मोनोरेल पुन्हा ट्रॅकवर येणार, पण चेंबूर ते वडाळापर्यंतच
संबंधित विषय
ताज्या बातम्या