३०० पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नाचा उडाला बार, पालिकेच्या कारवाईनं वाजला बँड

(Representational Image)
(Representational Image)

महाराष्ट्र सरकारसह बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं लॉकडाऊन संदर्भात कडक नियम लागू केले आहेत. याअंतर्गत केवळ ५० पाहुण्यांना लग्नसोहळ्यात बोलवण्याची अनुमती आहे. पण पालघरमधल्या एका कुटुंबानं हे नियम मोडले. त्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला.

लग्नात कोविडशी संबंधित निकषांचं उल्लंघन केल्याबद्दल वराच्या पालकांना अटक करण्यात आली होती. शिवाय, त्यांचाकडून ५० हजारांचा दंड आकारण्यात आला.

वृत्तानुसार, महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील दुपारेपाडा गावात रविवारी, १४ मार्च रोजी सायंकाळी ३०० हून अधिक पाहुणे लग्नसमारंभात हजर होते. जिल्हा अधिकाऱ्यांनी पाहणी करण्यासाठी अचानक घटनास्थळला भेट दिली. त्यावेळी अनेकांनी मास्क घातलं नव्हतं. याशिवाय सामाजिक अंतर पाळलं नव्हतं.

नवीन नियमांनुसार विवाहसोहळ्यांच्या ठिकाणी ५० जणं हजर राहू शकतात. तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक अशा इतर सर्व सार्वजनिक मेळाव्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

लोकांना ऑनलाइन दर्शनास उपस्थित राहण्यास प्रोत्साहित केलं पाहिजे. विश्वस्थांना धार्मिक स्थळांवर गर्दी नसल्याचे सुनिश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी नाही.

आठवड्याच्या सुरुवातीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असा इशारा दिला होता की, जर रुग्ण वाढत राहिली तर कठोर उपाययोजना लागू करण्यात येतील. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही असा इशारा दिला होता की, शहरात किंवा राज्यात आणखी निर्बंध लागू होऊ शकतात.


हेही वाचा

मुंबई पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा सुधारणार- हेमंत नगराळे

अँटिलियाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच, एनआयएचा खुलासा

पुढील बातमी
इतर बातम्या