तोतया सीबीआय अधिकारी गजाआड

सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून नागरिकांना ठकवणाऱ्या दोघांना एमएचबी पोलिसांनी अटक केली आहे. अश्विनी शर्मा आणि साजिद वारेकर अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी चारकोपमधील एका दाम्पत्याला खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याच्या नावाखाली त्याच्याकडून ५० लाख रुपये आणि इनोव्हा कार घेतली होती. रोजच्या त्रासाला कंटाळून तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण पुढे आलं.

काय आहे प्रकरण?

चारकोप परिसरातील तक्रारदार हे एलआयसी एजंट म्हणून काम करतात. जुलै महिन्यात शर्मा आणि वारेकर यांनी तक्रारदार यांना हेरून त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवली होती. आपल्या जाळ्यात हे दाम्पत्य अडकल्याची खात्री झाल्यानंतर या दोघांनी त्यांच्याजवळ १ कोटी रुपयांची मागणी केली. तडजोडी अंती त्यांनी ५० लाख रुपये स्वीकारण्याचं ठरवलं.

वारंवार पैशांसाठी फोन

त्यानुसार आरोपींना या दाम्पत्याला बोरिवलीतील एस.के.रिसाॅर्ट इथं बोलावलं. पैसे न दिल्यास एन्काऊन्टर करण्याचीही धमकी दिली. त्यानुसार या दाम्पत्याने ३ टप्यात ५० लाख रुपये रोख आणि एक इन्होवा कार दिली. मात्र एवढे देऊनही आरोपींची भूक भागत नव्हती. वारंवार ते पैशांसाठी फोन करत असल्यामुळे अखेर या दाम्पत्याने एमएचबी काॅलनी पोलिसांत धाव घेतली.

१६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

पोलिसांनी या आरोपींना जाळ्यात अडकवण्यासाठी बनाव रचला. या दाम्पत्याला पैसे देण्याचं आश्वासन देण्यास सांगून पोलिसांनी पाळत ठेवली आणि दोघांना रंगेहाथ अटक केली. या दोघांवरही विविध पोलिस ठाण्यात ५ गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. न्यायालयाने या आरोपींना १६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


हेही वाचा-

दुर्मिळ कासवांची तस्करी करणारे अटकेत

#MeeToo च्या संकटात पोलिसांचा दिवाळी 'उमंग'?


पुढील बातमी
इतर बातम्या