अॅमेझाॅनची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल

ॲमेझॉनने आपल्या ॲपमध्ये मराठी भाषा समाविष्ट करून घेण्यात नकार दिल्यानंतर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मुंबईच्या पवई   आणि साकीनाका परिसरातील ॲमेझॉन गोडाऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. या प्रकरणी आता साकीनाका आणि पवई पोलिस ठाण्यात मनसैनिकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

हेही वाचाः- मनसे- अॅमेझॉन वादात फ्लिपकार्टची बाजी, ग्राहकांना दिला मराठीचा पर्याय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनच्या कार्यालयामध्ये प्रवेश करू नये म्हणून नोटीस बजावण्यात आली होती. कालच ही नोटीस बजावण्यात आल्यानंतर राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज मनसे कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. व्यवहारासाठी ॲमेझॉन कंपनीने महाराष्ट्रात मराठी भाषेचा समावेश करावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून मनसेकडून करण्यात येत आहे. मात्र ॲमेझॉन कंपनीने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. ॲमेझॉनने आपल्या ॲपमध्ये इतर भाषांना स्थान दिलं असलं तरी मराठी भाषा सामावून घेण्यास असमर्थता दाखवलेली आहे. त्यामुळे मनसेने या विरोधात आंदोलन पुकारले असून मराठी भाषा नाही ॲमेझॉन नाही अशी मोहीम सुरू केली आहे.

हेही वाचाः- लाँग विकेंडमुळे पर्यटकांची अलिबाग, शिर्डी, महाबळेश्वरला पसंती

दरम्यान पवई आणि साकीनाका परिसरातील अॅमेझाँनची कार्यालय फोडल्यानंतर पोलिसांनीआता मनसैनिकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 

पुढील बातमी
इतर बातम्या