ऐकावं ते नवलचं! चोरीचा माल लपवला विहिरीत

सराईत चोर चोरी करण्यासाठी आणि त्यानंतर चोरीची मालमत्ता लपवण्यासाठी काहीही करू शकतात याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी कुरार पोलिसांना आला. जयकुमार पटेल नावाच्या आरोपीने चोरलेली संपूर्ण मालमत्ता चक्क विहिरीत लपवली होती. कुरार पोलिसांना पंपाच्या मदतीने विहिरीतील पाणी काढून हा चोरीचा ऐवज जप्त केला आहे.

कसा लपवला चोरीचा माल?

काही दिवसांपूर्वी मोबाईल दुकानात झालेल्या चोरीप्रकरणी कुरार पोलिसांनी जयकुमार पटेल (१८)  आणि त्याचा साथीदार जॅकी हरीश गोस्वामी (२४) यांना अटक केली. या दोघांकडून कुरार पोलिसांनी चोरी करण्यात आलेले ३१ मोबाईल जप्त केले. चौकशीत जयकुमारने ४० हजार रुपयांचे दागिने चोरल्याचे उघड झाले. मात्र ज्या ठिकाणी हे दागिने लपवण्यात आले होते ती जागा बघून पोलीस देखील थक्क झाले.चोरीची मालमत्ता कोणाच्याही हाती लागू नये म्हणून जयकुमारने हे ४० हजारांचे दागिने एका पिशवीत बांधून ही पिशवी कुरारमधील एका विहिरीत टाकली.

 

कसा काढला माल?

दागिने जप्त करणं गरजेचं असल्याने कुरार पोलिसांनी पंप लावून विहिरीतील पाणी काढलं. पाणी काढल्यानंतर विहिरीतील कचरा उपसून कुरार पोलिसांनी दागिन्यांनी भरलेली ही पिशवी जप्त केली. या विहिरीतून पोलिसांनी सोन्या-चांदीच्या बांगड्या, मंगळसूत्र, कानातले तसेच इतर दागिने जप्त केले आहेत. 


हेही वाचा-

300 रूपयांच्या वजडीसाठी मित्राची हत्या

एनसीसी परेड करताना विद्यार्थिनीचा मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या