कुरिअर बाॅयकडून महिलेवर जिवघेणा हल्ला; दादरमधील घटना

मराठी का बोलत नाही, असं विचारल्याचा राग येऊन एका परप्रांतिय तरुणाने दादरमधील शिवाजी पार्क येथे महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडली. या हल्यात विनीता पेडणेकर (५१) ही महिला जखमी झाली आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात इब्राहिम शेख (२७) तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सहाय्यक पोलिस आयुक्त अजिनात सातपुते यांनी सांगितले. 

गालावर पेनाने ओरखडे

दादरच्या सेनाभवनजवळील एन.सी.केळकर मार्गावरील गुरू कृपा इमारतीत विनीता पेडणेकर या कुटुंबियांसोबत राहतात. शुक्रवारी त्यांनी फोरम कुरिअरद्वारे काही पुस्तके मागवली होती. ही पुस्तके घेऊन सकाळी ११ वाजता आरोपी इब्राहिम शेख विनीता यांच्या घरी गेला.त्यावेळी त्याला हिंदीही व्यवस्थित बोलता येत नव्हते.विनीता यांनी त्याला महाराष्ट्रात काम करताना मराठी बोलणं गरजेचं असल्याचं सांगितलं. यावरून इब्राहिमने विनिता यांना उर्मटपणे उत्तरे दिली.त्यावेळी विनीता यांची धाकटी बहिण सुजीता पेडणेकर बोलल्या असता इब्राहिमने त्यांच्या डोक्यात बुक्की मारली.एवढ्यावरच न थांबता इब्राहिमने अचानक हातातील पेन विनिता यांच्या गालावर ओढला. यामध्ये त्यांना गालावर जखम झाली.  दोघींनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी मदतीसाठी धावले. 

 एका महिन्यात आधारकार्ड ?

स्थानिकांनी ही गोष्ट मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या कानावर घातल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी शिवाजी पार्क पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी इब्राहिमला ताब्यात घेतले असून त्याच्यावर शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रकिया सुरू आहे. इब्राहिम हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवाशी असून तो सध्या माटुंगा पूर्व परिसरात राहत अाहे. महिन्याभरापूर्वी तो मुंबईत आला असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वी येऊनसुद्धा त्याच्याजवळ मुंबईतले आधारकार्ड आढळून आले. त्यामुळे इब्राहिम हा नक्की पश्चिम बंगालमधून आला आहे की बांगलादेशमधून हे पोलिस तपासून पाहत आहेत. तसंच त्याने बनवलेले आधारकार्डही खरे आही की खोटे हे पोलिस पडताळून पाहत आहेत. 
 परप्रांतियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढत आहे. याकडं वेळोवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं आहे. एका महिन्यापूर्वी येऊन त्याला आधारकार्ड मिळाले कसे? याची चौकशी झाली पाहिजे.अशा उर्मट परप्रांतियांविरोधात मनसेचा संघर्ष कायमच सुरू राहणार.
-संदीप देशपांडे, मनसे नेते


हेही वाचा - 

भीक मागताना गुंड इजाज लकडावालाच्या भावाला अटक; जामिनावर सुटून होता फरार

मुंबईची लोकल पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर


पुढील बातमी
इतर बातम्या