भीक मागताना गुंड इजाज लकडावालाच्या भावाला अटक; जामिनावर सुटून होता फरार

समीर हा हाजी अली दर्गाच्या बाहेर बसला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. ज्या वेळी समीरला अटक करण्यासाठी पोलिस गेले त्यावेळी समीर भीक मागत होता. पोलिसांना पाहून पळून न जाता, समीर स्वतःहून त्यांच्याजवळ गेला.

भीक मागताना गुंड इजाज लकडावालाच्या भावाला अटक; जामिनावर सुटून होता फरार
SHARES

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक इजाज लकडावाला याच्या चुलत भावाला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. समीर लकडावाला असं या आरोपीचं नाव आहे. पाच वर्षानंतर समीरला शोधून काढण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे. २०१२ साली एका खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला अटक केली होती.


समीरवर उपासमारीची वेळ 

कुख्यात गुंड इजाज लकडावालाच्या सांगण्यावरून २००३ आणि २०१२ मध्ये समीरने अंधेरीतील एका व्यापाऱ्याकडे खंडणी मागितली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटकही केली. मात्र अटकेच्या कारवाईनंतर तो पुन्हा जामीनावर बाहेर आला. सुरूवातीचे काही दिवस तो राजस्थानच्या अजमेरमध्ये नाव बदलून वावरत होता. मात्र कालांतराने त्याच्यावर उपासमारीची वेळ आल्यानंतर तो मुंबईत आला. मुंबईतही सहकाऱ्यांकडून पैसे मिळणे बंद झाले होते. भाऊ इजाजलाही त्याचा विसर पडला होता. बुधवारी समीर हाजी अली दर्गाच्या बाहेर बसला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय सावंत आणि सचिन कदम यांनी त्याला सापळा रचून अटक केली. ज्या वेळी समीरला अटक करण्यासाठी पोलिस गेले त्यावेळी समीर भीक मागत होता.  पोलिसांना पाहून पळून न जाता, समीर हा स्वतःहून त्यांच्याजवळ गेला. उपासमारीने मरण्यापेक्षा जेलमध्ये तीन वेळेचं अन्न तरी मिळेल, असं सांगत तो पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला.  


कोण आहे इजाज 

जोगेश्वरी परिसरात राहणारा इजाज हा डाॅन छोटा राजन आणि कालांतराने डी गँगसाठी काम करत होता. मुंबईसह दिल्लीत त्याच्या विरोधात २४ खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद आहेत. यातील दोन गुन्ह्यात समीरचा सहभाग होता. मुंबईतल्या नामांकित गुंडांच्या यादीत इजाजचा  नंबर असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे. २००४ मध्ये त्याला कॅनडा येथे स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर बाहेर पडल्यानंतर तो ५ वर्ष भूमिगत होता. सध्या इजाज कुठे आहे याची माहिती कुणालाच नाही. मात्र, परदेशात राहून इजाज आपल्या हस्तकांच्या वेळोवेळी संपर्कात असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातं.  




 
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा