नोकरीचं आमिष दाखवून १२ महिलांना परदेशात वेश्या व्यवसायात ढकललं

परदेशात मोठ्या पदावर नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून देशातील १२ महिलांना बहरीन येथे नेत त्यांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी या टोळीतील मुंबईत वास्तव्यास असलेले मोहम्मद शेख (५६), टिंकू राज (३६) या दोन हस्तकांना नुकतीच अटक केली आहे. या आंतरराष्ट्रीय टोळीच्या तावडीतून पळ काढण्यात यशस्वी ठरलेल्या महिलेमुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे.

आमिष दाखवून फसवणूक

नागपाडा परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीची तिच्याच नातेवाईकांनी कमाल शेख याच्याशी ओळख करून दिली होती. कमाल हा देखील नागपाडा परिसरातच राहणारा असून तो मुंबईतून महिलांना अरब देशात पाठवण्याचं काम करतो. त्यावेळी कमालने पीडित महिलेला आपल्या मित्राचं बहरीन येथे हाॅटेल असून त्याच्या हाॅटेलमध्ये स्टाफची गरज आहे. शिवाय प्रतिमहिना ५० हजार रुपये मिळू शकतात असं कमालने त्या तरुणीला सांगितलं. पुढील महिन्यात आपण त्याची भेट करून देऊ, असं आश्वासनही कमालने पीडितेला दिलं होतं.

कालांतराने हे ना ते कारण सांगून कमालने पीडितेला सलीम येणार नसल्याचं सांगितलं. शिवाय नोकरीची व्यवस्था मात्र त्या ठिकाणी करण्यात आल्याचं सांगत त्याने तिला विश्वासात घेतलं. त्यानुसार १३ जुलै रोजी पीडित तरुणीला बहरीनला पाठवण्यात आलं. काही महिने मुलीच्या आईच्या खात्यावर रक्कमही जमा होऊ लागली. कालांतराने तिचा पासपोर्ट जमा करून घेत तिला वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्यात आलं.

अखेर मुलीची सुटका

याबाबतची माहिती तरुणीनं छुप्या पद्धतीनं भारतातील तिच्या घरातल्यांना दिली. घरातल्यांना कमालला याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने मुलगी हवी असल्यास २ लाख रुपये द्या अन्यथा मुलीला तेथेच ठार केलं जाईल, असं सांगितले. मुलीच्या घरातल्यांनी २ लाख रुपये देऊन मुलीची सुटका करून घेतली.

दोन एजंटला अटक

२२ आॅक्टोंबर रोजी मुलगी भारतात आल्यानंतर मुलीच्या घरातल्यांनी नागपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत हा गुन्हा अधिक तपासासाठी खंडणी विरोधी पथकाकडे सोपवला. या गुन्ह्यात पोलिसांनी मुंबईतील दोन एजंटला अटक केली आहे. सुटका झालेल्या मुलीच्या चौकशीतून या टोळीने अशा १२ महिलांना त्या ठिकाणी डांबून ठेवत त्यांना वेश्या व्यवसायात ढकलल्याचं सांगितलं.


हेही वाचा - 

कपड्याचं माप घेतना महिला डॉक्टरचा विनयभंग

#MeToo : टाटा इन्स्टिट्युट अाॅफ सोशल सायन्सच्या प्राध्यापकावर विद्यार्थीनीचा अारोप

पुढील बातमी
इतर बातम्या