रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या नावाखाली फसवणूक करणारी टोळी अटकेत

ऑनलाईन पद्धतीनं रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन देतो अशी बतावणी करून लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या रॅकेटचे धागेदोर थेट बिहारपर्यंत जुळले आहेत.

१६ जून रोजी एका व्यक्तीनं ऑनलईन पद्धतीनं रेमडेसिव्हीर इंजेक्शन मागवलं होतं. पण त्याला हे इंजेक्शन वेळेवर मिळालंच नाही. ऑनलाईन पद्धतीनं पैसे देऊनही इंजेक्शन न मिळाल्यामुळे या व्यक्तीने मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

याच तक्रारीच्या अनुषंगानं तपास करत पोलिसांनी या रॅकेटचा भांडाफोड केला. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ६० लाख रुपये आणि १०० सीमकार्ड जप्त केले आहेत. तसंच एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. यामुळे आपल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी लोक जमेल त्या मार्गानं रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करत होते. अशा काळात सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून रेमडेसीव्हीर इंजेक्शनच्या ऑर्डसाठी संपर्क करा, असे मेसेजेस फिरत आहेत.

या प्रकरणातील आरोपींना ट्रेस करणं कठीण होतं. पण तरीही तांत्रिक बाबींच्या आधारे मुंबई सायबर पोलिसांची टीम थेट बिहारला पोहोचली. तिथं पोहोचल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं फसवेगिरी करण्यासाठी एक प्रॉपर कॉल सेंटर चालवलं जात असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी या कॉल सेंटरवर धाड टाकून ६ जणांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार या रॅकेटमध्ये पकडण्यात आलेले आरोपी हे सुशिक्षित आहेत. बी टेक, बीएस्सी आणि १२ वी सायन्स असं शिक्षण घेतलेले यातील काही आरोपी आहेत. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. या आरोपींनी याआधी बजाज फायनान्सचं कर्ज मिळवून देतो असं सांगूनही अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलंय.

या आरोपींनी कोरोनाचे जेवढे व्हेरिएन्ट्स आहेत त्यानुसार लागणारी औषधे आणि त्यांची माहिती मिळवून ठेवली होती. याच माहितीच्या आधारे हे आरोपी नागरिकांची फसवणूक करायचे. हे लोक तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्यानं त्या अनुषंगानंसुद्धा फसवणुकीची तयारी करत होते.


हेही वाचा

गँगस्टर सोनू पठाणला अटक, मैत्रिणीला भेटायला येणं भोवलं

जेएनपीटी बंदरात ८७९ कोटींचं हेरॉईन जप्त

पुढील बातमी
इतर बातम्या