जेएनपीटी बंदरात ८७९ कोटींचं हेरॉईन जप्त

मागील १० वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. हे अंमली पदार्थ अफगाणिस्तान येथून इराणमार्गे जेएनपीटी बंदरात आयात करण्यात आलं होतं.

जेएनपीटी बंदरात ८७९ कोटींचं हेरॉईन जप्त
SHARES

उरण येथील जेएनपीटी बंदरात २९३ किलो हेरॉईन हे अंमली पदार्थ जप्त केलं आहे. तस्करी करुन आणण्यात आलेल्या या अंमली पदार्थाची किंमत तब्बल ८७९ कोटी रुपये इतकी आहे. डीआरआयच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

मागील १० वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. हे अंमली पदार्थ अफगाणिस्तान येथून इराणमार्गे जेएनपीटी बंदरात आयात करण्यात आलं होतं. तुरटी आणि सुगंधी पावडर (तोंडाला लावायची पावडर) असल्याचे भासवून मागील वर्षभरापासून हेरॉईनची तस्करी सुरु होती. याबाबत संशय आल्यानंतर डीआरआयच्या पथकाने शुक्रवारी या मालाची तपासणी केली. त्यानंतर ते हेरॉईन असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डीआरआयच्या पथकाने तस्करी करुन आणण्यात आलेले तब्बल ८७९ कोटी रुपये किमतीचे २९३ किलो हेरॉईन जप्त केले. 

हे अंमली पदार्थ जेएनपीटीमधून पंजाब येथे पाठविण्यात येणार असल्याचं तपासात आढळून आलं आहे. या प्रकरणात आयातदार प्रभजोत सिंग याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. जेएनपीटीत उतरविण्यात आलेले हे हेरॉईन मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरात नंतर वितरीत होणार होते.

गेल्यावर्षीही जेएनपीटी बंदरात १९१ किलो इतके हेरॉईन सापडले होते. आयुर्वेदिक उपचारांसाठी वापरल्या जाणार्‍या मुलेठीच्या आयातीच्या आडून ही तस्करी करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात समुद्री मार्गाने भारतात अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. गेल्या सहा महिन्यात सुमारे पाच हजार कोटींचे अमली पदार्थ भारतीय समुद्री क्षेत्रात तटरक्षक दल व नौदलाने कारवाईत जप्त केले आहेत. मार्च महिन्यात लक्षद्विपजवळ एका श्रीलंकन बोटीतून ३०० किलो हेरॉईनसह पाच एके-४७ रायफली जप्त करण्यात आल्या होत्या.



हेही वाचा-

विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ

महापालिका 'यांच्या'साठी खरेदी करणार २४ नव्या गाड्या

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा