विमानात सिगारेट पिणं पडलं महागात

मुंबईच्या सहार पोलिसांनी विमानात धूम्रपान करणाऱ्या दोघांना गुरूवारी अटक केली आहे. साबजी कसाम आणि राॅनी आलम अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे कोलकाता-मुंबई विमान प्रवासादरम्यान विमानाच्या शौचालयात धूम्रपान करत होते. न्यायालयाने या दोघांची जामीनावर सुटका केली आहे.

गोंधळ उडाला

कोलकाताच्या मालदा येथील रहिवाशी असलेले आरोपी गुरूवारी आंतरराष्ट्रीय विमानाने मुंबईला येत होते. विमानात बसल्यानंतर या दोघांना धूम्रपान करण्याची इच्छा झाली. मात्र विमानात धूम्रपान करण्यावर बंदी असल्याने हे दोघे विमानाच्या शौचालयात गेले. त्या ठिकाणी या दोघांनी सिगारेट पेटवल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर झाला. या धूरामुळे विमानातील अँन्टी स्मोकिंग अलार्म वाजला. त्यावेळी वैमानिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.  शोधाशोध सुरू असताना वाजलेला अलार्म हा बाथरूमचा असल्याचं लक्षात आलं. फ्लाइट मॅनेजरने प्रवाशी प्रवास करत असलेल्या ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी दोन प्रवासी जागेवर नसल्याचं दिसून आलं. विमानाच्या शौचालयाच्या आत हे दोघे सिगारेट पीत होते.

जामीनावर मुक्तता 

शौचालयातून येणाऱ्या धूरामुळे फ्लाइट मॅनेजरने दोघांना ताब्यात घेतलं. त्यावेळी दोघांजवळ सिगारेटचे पाकिट आणि माचिस आढळून आले. विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर या दोघांचा ताबा सीआरपीएफ जवानांकडे देण्यात आला. सीआरपीएफ जवानांनी दोघांना विमानतळ पोलिसांच्या हवाली केले. विमानतळ पोलिसांनी  दोघांवर ३३६,२५ भा.द.वी कलमांतर्गत गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली. न्यायालयाने या दोघांची जामीनावर मुक्तता केल्याचं पोलिसांनी सांगितलं.


हेही वाचा -

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांचा राजीनामा अखेर मंजूर

गणपती उत्सवात चोरट्यांचा उच्छाद, चोरीची घटना सीसीटिव्हीत कैद


पुढील बातमी
इतर बातम्या