गणपती उत्सवात चोरट्यांचा उच्छाद, चोरीची घटना सीसीटिव्हीत कैद


गणपती उत्सवात चोरट्यांचा उच्छाद, चोरीची घटना सीसीटिव्हीत कैद
SHARES
मुंबईत गणपती उत्सवात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चिराबाजार येथील एका गणपतीच्या मंडपात झोपलेल्या मंडळाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या खिशातून चोरट्याने मोबाइल चोरल्याची घटना उघडकिस आली आहे. तर दोन दिवसांपूर्वी शेजारच्या मंडळात चोरट्याने गणपतीच्या गळ्यातील नोटांचा हार चोरला आहे. या दोन्ही घटनांमधील मोबाइल चोरी करताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईच्या चिराबाजार ताडवाडी सार्वजनिक गणशोत्सव मंडळाने १ सप्टेंबर रोजी मंडळाच्या गणेशमूर्तीची स्थापना केली. त्या रात्री गणपतीच्या मिरवणूकीत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाल्याने कार्यकर्ते थकलेल्या अवस्थेत मंडपात झोपले होते. त्याच रात्री एका भुरट्या चोराने मंडपात मध्यरात्री प्रवेश केला. सुरूवातीला त्याने गणपतीच्या अंगावरील दागिन्यांची चाचपणी केली. मात्र मूर्तीवर मौल्यवान दागिने नसल्यामुळे मूर्तीच्या पायाजवळचे ५१ रुपये पाया पडण्याच्या नावाखाली खिशात घातले. 

एवढ्यावरच न थांबता तेथून तो कार्यकर्ते झोपलेल्या मंडपाच्या ठिकाणी आला. त्यावेळी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कांतिलाल पटेल हे मोबाइल वरच्या खिशात ठेवून झोपलेले होते. या चोराने अलगत त्यांच्या खिशातून मोबाइल चोरून पळ काढला. हा चोरीचा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे. या घटनेची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली आहे. या घटनेनंतर काही दिवसांनीच शेजारी असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीच्या अंगावरील पैशांचा हार चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या मंडपात सीसीटिव्ही नसल्यामुळे चोराची ओळख पटवणं कठीण जात आहे. या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आला नसून पोलिस सीसीटिव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत आहेत. तसंच सर्व मंडळांना भुरट्या चोरांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.



हेही वाचा -

मुंबईत काश्मिरी गायकाला घर मालकाने हाकललं

डोंगरीत इमारतीचं छत कोसळून एकाचा मृत्यू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा